मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील मंदिरावर खलिस्तावाद्यांनी लिहिली भारतविरोधी घोषणा !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील ‘ऑस्ट्रेलिया टुडे’ दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार येथील मिल पार्कमधील स्वामी नारायण मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी भारतविरोधी लिखाण केले आहे. यावर ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’, असे लिहिण्यात आले आहे. याविषयी मंदिराच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे की, अशा घटनेने आम्ही दुःखी आहोत. आम्ही शांतता आणि सद्भावना यांसाठी प्रार्थना करतो. याविषयी लवकरच विस्तृत निवेदन प्रसारित करू.

१. या घटनेविषयी खासदार इवान मुल्होलँड यांनी या दैनिकाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ही घटना येथील शांतीपूर्ण हिंदूंसाठी आणि पवित्र ठिकाणी झाल्याने त्रासदायक आहे.

२. अमित सारवाल नावाच्या पत्रकाराने सांगितले की, याविषयी हिंदूंनी पोलीस आणि खासदार यांच्याकडे तक्रार केली आहे. गेल्या एक वर्षापासून अशा प्रकारच्या घटना येथे घडत आहेत. यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही मंदिरावर घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.

३. खलिस्तानवाद्यांच्या एका गटाने खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचे कौतुक केल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. भिंद्रनवाले याला वर्ष १९८४ च्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील सैन्य कारवाईत ठार करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका 

खलिस्तानवाद्यांची वाढत्या भारतविरोधी कारवाया रोखण्यासाठी सरकारने आता कठोर कारवाई करणे आवश्यक !