राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ‘ईडी’ची धाड !

भाजपचे नेते किरीट सोमय्या (डावीकडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (उजवीकडे)

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालय) ११ जानेवारीला सकाळी धाड टाकली. याचसमवेत ‘ईडी’ने हसन मुश्रीफ यांचे पुणे येथील सहकारी चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयावरही धाड टाकली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याच्या संदर्भात ही कारवाई केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जून २०१९ मध्येही आयकर विभागाने धाड टाकली होती. ‘ईडी’ने धाड टाकल्यावर मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी चौकाचौकात गर्दी करण्यास प्रारंभ केला.

विशिष्ट समाजाच्या लोकांना ‘लक्ष्य’ केले जात आहे का ? अशी शंका येते ! – हसन मुश्रीफ

या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘बिक्स आस्थापन आणि माझे जावई यांचा काहीही संबंध नाही. आज घातलेली धाड कोणत्या सूत्रावर केली आहे ? मला समजत नाही. राजकारणासाठी असे केले जात आहे. विशिष्ट समाजाच्या लोकांना ‘लक्ष्य’ केले जात आहे का ?, अशी शंका येते.’’

हसनमियांना हिशोब द्यावाच लागेल ! – किरीट सोमय्या, भाजप

मुश्रीफांनी जावयाच्या आस्थापनाला कंत्राटे दिली, याचा हसनमियांना हिशोब द्यावाच लागेल. महाविकास आघाडीमधील प्रत्येक भ्रष्ट मंत्र्याला भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावा लागेल. यात तत्कालीन ग्रामविकास सचिवही सहभागी असून ‘हसनमियांना आता धर्म आठवतोय का ?’ असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.