खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवले नाही ना, याची चौकशी करा ! – हिंदु जनजागृती समिती

पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात सापडलेल्या पोतेभर खोट्या दागिन्यांचे प्रकरण

सोलापूर, १० जानेवारी (वार्ता.) – नुकतेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोते भरून खोटे दागिने सापडल्याचे मंदिरातील अधिकार्‍यांनी सांगितले. यामागे काही भाविक जाणूनबुजून असे खोटे दागिने टाकत असल्याचे सांगण्यात आले. यातून एकप्रकारे मंदिर प्रशासनाने स्वत:चे हात झटकले आहेत. या प्रकरणी मंदिरातीलच कुणीतरी खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची शासनाने उच्चपदस्थ अधिकार्‍यांकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलीे.

या संदर्भातील एक निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले. शमा पवार यांनी निवेदन स्वीकारून ‘योग्य त्या कार्यवाहीसाठी हे निवेदन पुढे पाठवले जाईल’, असे आश्‍वासन या वेळी दिले.

सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देतांना डावीकडून सौ. स्वाती सोळंके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे आणि श्री. दत्तात्रय पिसे

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,

१. यापूर्वीही मंदिर प्रशासनाच्या कारभारात ‘दानपेटीत जमा होणारे पैसे प्रतिदिन बँकेत जमा न करता दोन-दोन मास पोत्यात भरून ठेवणे’, ‘हिशोबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे’, ‘प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे; मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे’, ‘मंदिरातील गोधन कसायांना विकणे’, ‘४८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे’, ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने वर्ष २००० ते २०१० या कालावधीत मंदिराला ४७ लाख ९७ सहस्र ७१६ रुपयांचा तोटा होणे’ आदी अनेक प्रकारचे घोटाळे हिंदु जनजागृती समितीने उघड केले आहेत. त्यामुळे पोते भरून खोटे दागिने सापडणे, या प्रकरणातही काळेबेरे असू शकते.

२. जे वारकरी आणि वैष्णवजन शेकडो किलोमीटर पायी वारी करतात. ऊन, पाणी, थंडी आदींची पर्वा न करता आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला येतात, ते विठुरायाला खोटे दागिने अर्पण का करतील ? हा तर एकप्रकारे भोळ्या-भाबड्या वारकर्‍यांवर आरोप केल्यासारखेच आहे. या प्रकरणी नेमके काय षड्यंत्र आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे. यामध्ये भाविक सराफाकडून देवासाठी दागिने सिद्ध करून घेतात, तेव्हा सराफाकडून खोटे दागिने दिले जात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचाही सरकारने शोध घ्यायला हवा. पुन्हा कुणाला असे करता येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने दागिने अर्पण करतांना ते खरे आहेत कि खोटे ?, हे त्वरित पडताळण्याची व्यवस्था करायला हवी. अशी व्यवस्था करणे, हे मंदिर प्रशासनासाठी कठीण नाही; मात्र अशी व्यवस्था अद्यापपर्यंत का निर्माण करण्यात आली नाही ? यातून मंदिर प्रशासनाला देवनिधीची किती काळजी आहे ? हेच दिसून येते.

मंदिराचे सरकारीकरण रहित करा !

हे सर्व मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. मंदिर व्यवस्थापन भक्तांकडे असेल, तर भक्त देवनिधी कधी लुटणार नाहीत. यासाठी मंदिराचे सरकारीकरण रहित करावे, अशीही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.