अखिल भाविक वारकरी मंडळाच्‍या वतीने महिला वारकरी मेळावा उत्‍साहात !

मेळाव्‍यात बोलतांना ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज आणि उपस्‍थित महिला

सोलापूर, ९ जानेवारी (वार्ता.) – अखिल भाविक वारकरी मंडळाच्‍या वतीने येथील निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे ७ जानेवारी या दिवशी महिला वारकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळाव्‍याला पोलीस आयुक्‍त दीपाली कोळे याही उपस्‍थित होत्‍या. या वेळी पोलीस आयुक्‍त कोळे म्‍हणाल्‍या, ‘‘महिलांना कुटुंब सांभाळत भजन करणे कठीण असूनही त्‍या श्रद्धेने सर्व करतात, हे कौतुकास्‍पद आहे. नारी शक्‍ती ही समाजहितासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.’’ मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज होते. या मेळाव्‍याच्‍या माध्‍यमातून महिलांचे संघटन व्‍हावे, महिलांचा वारकरी परंपरेत सहभाग वाढावा, तसेच विशेष कार्य करणार्‍या महिलांचा सन्‍मान व्‍हावा, या उद्देशाने आयोजन करण्‍यात आले होते.

संघटनेची रचना आणि कार्यपद्धती ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी अध्‍यक्षीय समारोप करतांना मांडली. कार्यक्रमाची प्रस्‍तावना शहर अध्‍यक्ष वैशाली वळसंगकर यांनी केली, तर प्रिया धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले. हा मेळावा यशस्‍वी करण्‍यासाठी नंदा बेलेराव, मंगल दीक्षित, जनाबाई निकम, शुभांगी शेळके, महानंदा पांढरे, लता पाठक यांसह अन्‍य पदाधिकारी महिलांनी परिश्रम घेतले.