हळदी-कुंकू लावणे, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे ! – डॉ. कल्पना पांडे, महिला सत्राच्या संयोजिका

  • नागपूर येथील ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या महिलांसाठीच्या विशेष सत्रात महिलांचे हळदी-कुंकू लावून स्वागत !

  • पुरोगामी आणि काँग्रेस यांना पोटशूळ !

डॉ. कल्पना पांडे

नागपूर – येथे ७ जानेवारी या दिवशी पार पडलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये महिलांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात सहभागी झालेल्या महिलांचे हळदी-कुंकू लावून स्वागत करण्यात आले. यामुळे या कृतीवर पुरोगामी आणि काँग्रेस यांच्याकडून टीका करण्यात आली. या टीकेला उत्तर देतांना या सत्राच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे म्हणाल्या, ‘‘हळदी-कुंकू लावणे, हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. एकमेकींना हळद-कुंकू लावणे, हा महिलांच्या भावनात्मक देवाण-घेवाणीचा प्रकार आहे. त्यात चुकीचे काय आहे ? झाशीची राणी लक्ष्मीबाई याही हळद-कुंकू लावत होत्या; मात्र ‘ते लावल्यामुळे त्या युद्ध जिंकल्या’, असे मी म्हणत नाही. याखेरीज दाराच्या ठिकाणी काढलेली सुंदर रांगोळी किंवा इतर सुंदर वस्तू पाहिल्या की, दारातून प्रवेश करतांना मनातील दुष्ट विचार दूर होऊन चांगले विचार मनात येतात. यासाठी या सत्रात रांगोळीचे माहात्म्य सांगितले होते. अशा सूत्रांवर वाद निर्माण करणार्‍यांच्या बुद्धीची कीव येते.’’

काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा हिंदुद्वेष !

(म्हणे) ‘रांगोळीच्या माध्यमातून दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी डॉ. कल्पना पांडे यांना चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर पाठवा !’

डॉ. कल्पना पांडे यांच्या रांगोळीविषयीच्या विधानावर टीका करतांना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे  यांनी ‘डॉ. कल्पना पांडे यांच्यासह कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कांचन गडकरी यांना रांगोळीच्या माध्यमातून दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर पाठवा’, असे विधान करून अकलेचे तारे तोडले. (धर्मशास्त्राचे काडीचे ज्ञान नसणारे आणि तरीही हिंदूंना उपदेशाचे डोस पाजून स्वतःचे हासे करून घेणारे काँग्रेसचे प्रवक्ते ! काँग्रेसने अन्य पंथियांच्या संदर्भात अशी टीका करण्याचे धाडस दाखवले असते का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारतीय संस्कृतीचे पालन करणार्‍या डॉ. कल्पना पांडे यांचे अभिनंदन ! त्यांची कृती इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे. काँग्रेसींच्या विरोधाला न जुमानता हिंदु संस्कृतीचा आदर्श ठेवून महिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात अशीच पद्धत राबवली पाहिजे !