साधकांची माता-पित्‍यासम काळजी घेणारे आणि त्‍यांना मायेतून बाहेर काढून त्‍यांची मोक्षप्राप्‍तीच्‍या मार्गावर वाटचाल करून घेणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

साधकांची पारमार्थिक काळजी घेत त्‍यांना घडवणारे श्रीमन्‍नारायणस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले साधकांना घडवत असणे

‘एक लहान मुलगा त्‍याच्‍या आई-वडिलांंच्‍या समवेत पेठेत जातो. तो मुलगा गर्दीत हरवू नये, यासाठी त्‍याचे आई-वडील त्‍याचा हात धरून चालत असतात. त्‍या लहान मुलाला पेठेतील एक वस्‍तू आवडते. तो त्‍याच्‍या आई-वडिलांचा हात सोडून ती वस्‍तू घ्‍यायला जातो. ‘मुलाला काय आवश्‍यक आहे ?’, ते त्‍याच्‍या आई-वडिलांना ठाऊक असते. ते त्‍याला ‘योग्‍य काय आहे ?’, ते समजावून सांगतात आणि त्‍याचा हात धरून त्‍याला योग्‍य मार्गावर आणतात. त्‍यानंतर एकदा ते मुलाला मध्‍येच एकटे सोडतात. ‘मुलगा त्‍या परिस्‍थितीत काय करतो ?’, हे ते पहातात. त्‍याला दिसणार नाही, अशा पद्धतीने ते त्‍याच्‍या मागे रहातात. अशा प्रकारे आई-वडील मुलाला योग्‍य पद्धतीने घडवत असतात. त्‍याचप्रमाणे हे परात्‍पर गुरुदेवा, तुम्‍ही आमचे सर्वस्‍व आहात. तुम्‍ही आम्‍हाला मायेतील बाजारातून मोक्षाच्‍या मार्गावर आणत आहात.

कु. शर्वरी कानस्कर

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले साधकांना विविध माध्‍यमांतून घडवत असणे

२ अ. स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया सांगणे : हे परात्‍पर गुरुदेवा, कलियुगातील या मायेच्‍या बाजारात तुम्‍हीच आमचे हात घट्ट धरले आहेत. आम्‍ही मायेतील गोष्‍टींमध्‍ये हरवू नये, यासाठी तुम्‍ही आम्‍हाला स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया सांगितली आहे.

२ आ. मार्गदर्शन करणे : परात्‍पर गुरु डॉक्‍टर, आम्‍ही अनेक वेळा मायेतील गोष्‍टींमध्‍ये अडकतो आणि तुमचा हात सोडतो. आम्‍ही अज्ञानी जीव आहोत. ‘आमच्‍या साधनेसाठी काय आवश्‍यक आहे ?’, हे तुम्‍हाला ठाऊक आहे. तुम्‍ही आमच्‍यावर करुणा करता आणि आम्‍हाला मार्गदर्शन करून आमचा हात धरून आम्‍हाला पुन्‍हा साधनेच्‍या मार्गावर आणता.

२ इ. सूक्ष्मातून समवेत असणे : या मार्गावरून जातांना प्रसंग आणि संघर्ष यांमुळे चालतांना आमचे पाय दुखत असतील, त्‍या वेळी तुम्‍ही आम्‍हाला कडेवर घेता अन् आम्‍हाला नेहमी आपल्‍या जवळ ठेवता.

२ ई. प्रसंगांच्‍या माध्‍यमातून शिकवणे : तुम्‍ही आमची विविध प्रसंगांच्‍या माध्‍यमातून परीक्षा घेता. प्रत्‍यक्षात प्रत्‍येक क्षणी तुम्‍ही आमच्‍या समवेत असता आणि प्रसंगांच्‍या माध्‍यमातून आम्‍हाला शिकवता. आम्‍ही अनेक वेळा तुमचा हात सोडतो; पण आमच्‍यापेक्षा तुम्‍हालाच आमची अधिक काळजी आहे. हे गुरुदेवा, आम्‍हीच सातत्‍याने प्रयत्न करायला अल्‍प पडतो.

३. श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांच्‍याप्रमाणे कलियुगात श्रीमन्‍नारायण रूपात अवतार घेऊन चैतन्‍य प्रदान करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

श्रीविष्‍णूने त्रेतायुगात श्रीरामाचा आणि द्वापरयुगात श्रीकृष्‍णाचा अवतार धारण केला. त्‍या वेळी या भूमीला त्‍यांच्‍या श्री चरणांचा स्‍पर्श झाला होता. ‘आता कलियुगात त्‍याच पावन भूमीवर बांधकाम झाले असल्‍याने आणि मानवाने त्‍या जागेचा गैरवापर केल्‍याने चैतन्‍य तेवढ्या प्रमाणात राहिले नाही’, असे जाणवते. असे असतांनाही भगवंताचे अस्‍तित्‍व प्रत्‍येक ठिकाणी असल्‍याने तिथेही काही प्रमाणात चैतन्‍य आणि आनंद यांची अनुभूती येते. ज्‍या भूमीवर साक्षात् नारायणाने त्‍याच्‍या परम पावन चरणांचा स्‍पर्श केला आहे, त्‍या पावन भूमीवर आम्‍हालाही स्‍पर्श करता येत आहे. या माध्‍यमातून आम्‍हाला श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुदेवांच्‍या चरणांतून पुष्‍कळ चैतन्‍य मिळत आहे.

४. कृतज्ञता

‘देवा, जेथे नारायण गुरुरूपात आहेत, त्‍या भूवैकुंठरूपी आश्रमातील भूमीचा स्‍पर्श होण्‍याची दिव्‍य संधी आम्‍हाला दिल्‍याबद्दल आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– गुरुदेवांची,

कु. शर्वरी कानस्‍कर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक