-
एअर इंडियाच्या विमानातील महिला प्रवाशांवरील पुरुष प्रवाशांकडून लघुशंका केल्याची प्रकरणे
-
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला फटकारले !
मुंबई – नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडिया आस्थापनेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. यासह आस्थापनेला नोटीसही बजावली आहे. एअर इंडियाच्या २ विमानांमध्ये महिला प्रवाशांवर पुरुष प्रवाशांकडून लघुशंका केल्याच्या घटना घडल्यावरून ‘या अत्यंत घाणेरड्या घटना असून असे प्रकार विमानात घडत असतील, तर हे एअर इंडियाचे अपयश आहे’, अशा शब्दांत महासंचालनालयाने एअर इंडियाला फटकारले आहे. विमानचालक आणि विमानातील कर्मचारी यांनी याप्रकरणी २ आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे देहली पोलिसांनी या कर्मचार्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले आहे.
गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर या दिवशी एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-देहली विमानाच्या प्रवासाच्या वेळी एका मद्यधुंद पुरुषाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर कलम २९४ आणि ३५४ अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर ६ डिसेंबर या दिवशी एअर इंडियाच्याच विमानात असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले होते. एका पुरुष प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती. याप्रकरणी पुरुष प्रवाशाला अटक करण्यात आली होती; महिलेची लेखी क्षमा मागितल्यानंतर प्रवाशाला सोडून देण्यात आले होते.
संपादकीय भुमिकाविमानातून विदेशात प्रवास करणार्यांमध्ये नैतिकता, सुसंस्कृतपणा किती आहे, हेच या घटना दाखवून देतात ! अशांवर संस्कार करण्यास शिक्षणपद्धत अपयशी ठरली, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! |