कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला बघून घेईन !

आप सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांची कारागृहातील अधिकार्‍यांना धमकी !

आप सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन

नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी आणि मंत्री सत्येंद्र जैन हे सध्या तिहार कारागृहात आहेत. तिहार कारागृहातील अधिकार्‍यांनी, ‘जैन यांनी आम्हाला धमकावले’, असा आरोप केला आहे. अधिकार्‍यांनी या प्रकरणी कारागृह महासंचालकांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. ‘माझी कारागृहातून सुटका झाल्यानंतर सगळ्यांना बघून घेईन आणि तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी जैन यांनी दिल्याचे त्यात म्हटले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने मागील वर्षी ‘आर्थिक अपव्यवहार’ (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात जैन यांना अटक केली होती. तिहार कारागृहात सत्येंद्र जैन यांना शरिराचा मसाज करण्यासह सर्व सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. जैन कारागृहात असतांना त्यांनी काही व्यक्तींची नियमबाह्य भेट घेतल्याचा ‘व्हिडिओ’ही प्रसारित झाल्याने वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी त्यांना  मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणीही केली होती. (अशी मागणी का करावी लागते ? जनताभिमुख कारभाराचे आश्‍वासन देणारे आप सरकार कलंकित मंत्र्यावर कारवाई का करत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

गुंडांप्रमाणे धमकी देणारे आपचे मंत्री जनहित काय साधणार ?