म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा !

काँग्रेसच्या कर्नाटकमधील घोषणापत्रात ‘म्हादईचे पाणी वळवणारच’, असा दावा

काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला

पणजी – म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करून केला आहे. यामध्ये खासदार रणदीप सिंह सुरजेवाला म्हणतात, ‘‘हुब्बळ्ळी येथे झालेल्या ‘म्हादई वॉटर रॅली’मुळे बेळगावी, हुबळी आणि धारवाड येथील लोकांना पिण्यासाठी म्हादईचे पाणी वळवण्यास बळ मिळणार आहे. काँग्रेसने म्हादईवर प्रकल्प बांधण्याचे ठरवले होते आणि वर्ष २०१० मध्ये म्हादई लवादाची स्थापना केली आणि लवादाचा निर्णय वर्ष २०१८ मध्ये झाला. काँग्रेस म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवणारच.’’

म्हादईप्रश्नी गोव्यात तीव्र असंतोष असतांनाही काँग्रेस पक्षाने कर्नाटक येथे होणार्‍या विधानसभेच्या निवडणूक घोषणापत्रात म्हादईचा उल्लेख केलेला आहे. या घोषणापत्रात काँग्रेस म्हणते, ‘‘म्हादई प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास आणि बेळगाव अन् हुब्बळ्ळी-धारवाड येथील जिल्ह्यांतील सुमारे ५० लाख लोकांसाठी म्हादईचे ३.९ ‘टी.एम्.सी.’ पाणी वळवण्यात भाजप अपयशी ठरला आहे. लोकांनी म्हादईचे स्वप्न काँग्रेसद्वारे पहावे. म्हादईप्रश्नी भाजप जनतेला मूर्ख बनवत आहे. केंद्रातील भाजपने वर्ष २००२ मध्ये म्हादई प्रकल्पाची तत्त्वत: मान्यता का रहित केली ? मोदी-बोम्मई सरकारांनी मागील ८ वर्षे म्हादई प्रकल्पाचे काम का चालू केले नाही ? कळसा आणि भंडुरा प्रकल्पांना वन किंवा पर्यावरण विभागांचा दाखला का दिला गेला नाही ?’’

म्हादईप्रश्नी गोव्यात तीव्र असंतोष असतांनाही काँग्रेस पक्षाने कर्नाटक येथे होणार्‍या विधानसभेच्या निवडणूक घोषणापत्रात म्हादईचा केलेला उल्लेख !

______________________________________