बंगालमध्ये ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीवर अज्ञातांकडून दगडफेक  

‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीवर अज्ञातांकडून करण्यात आलेली दगडफेक  

मालदा (बंगाल) – येथे ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली. कुमारगंज रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. त्यामुळे ‘सी-१३’ डब्याची हानी झाली. ४ दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील या पहिल्या ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला होता. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी या घटनेची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, ही घटना दुर्दैवी आहे. या गाडीच्या उद्घाटनाच्या दिवशी ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ममता बॅनर्जी अप्रसन्न झाल्या होत्या. त्या घटनेचा हा सूड आहे का ?, असा प्रश्‍न अधिकारी यांनी विचारला आहे.