साधनेत रममाण झालेल्या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजयालक्ष्मी रामजी चव्हाण (वय ८७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्रीमती विजया चव्हाण

१. मंदिरातील सनातन संस्थेच्या कापडी फलकावरील (‘बॅनर’वरील) लिखाण वाचून सत्संगाला जाणे

‘मी संभाजीनगर येथे ‘महाराष्ट्र राज्य समाजकल्याण सल्लागार बोर्ड’ या खात्यात नोकरी करत होते. वर्ष १९९२ मध्ये वयाच्या ५८ व्या वर्षी मी ‘मुख्य सेविका’ या पदावरून निवृत्त झाले. तेव्हा मला ‘आता पुढे काय करायचे ?’, हा मोठा प्रश्न पडला होता. तेव्हा आम्ही संभाजीनगर येथे रहात होतो. आमच्या घराजवळ एकनाथ महाराजांचे मंदिर आहे. तेथे दिवसभर धार्मिक कार्यक्रम चालू असत. मी प्रतिदिन त्या मंदिरात जात असे.

वर्ष १९९४ मध्ये त्या मंदिरात सनातन संस्थेचा कापडी फलक (‘बॅनर’) लावला होता. त्यावर गणपति मंदिरात होणार्‍या सनातनच्या सत्संगाची वेळ आणि पत्ता लिहिलेला होता. मी घरी आल्यावर माझ्या भाच्याला (बहिणीच्या मुलाला श्री. सुनील जाधव याला) त्याविषयी माहिती विचारली. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘आपल्या घरापासून ते मंदिर दूर आहे. मी तुला गाडीने मंदिरात पोचवतो आणि तुला न्यायलाही येतो. काळजी करू नकोस.’’ त्याने मला वेळेत मंदिरात पोचवले. तेव्हा मला फार समाधान वाटले.

२. सत्संगाला जाणे आणि सेवा करणे

मी मंदिरात सत्संग घेणार्‍या श्रीमती जयश्री मुळे यांच्याशी ओळख करून घेतली. तेव्हा त्या माझ्या भाच्याला म्हणाल्या, ‘‘तुम्ही आता यांना न्यायला येऊ नका. मी त्यांना घरी पोचवते. मलाही तुमच्या कुटुंबाचा परिचय होईल.’’ त्यानंतर त्या आमच्या घरी येऊ लागल्या. मला त्यांचा सहवास मिळाला. नंतर मी सेवाही करू लागले. माझा मुळेकाकूंशी चांगला परिचय झाला. मी प्रतिदिन त्यांच्या समवेत प्रचाराला जाणे, सत्संगाला जाणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे इत्यादी सेवा करू लागले.

३. श्रीमती जयश्री मुळे यांच्या समवेत सनातनच्या कार्यात रममाण होणे

मुळेकाकू मनमिळाऊ आहेत. मी त्यांच्या समवेत सनातनच्या कार्यात रमून गेले. त्या आमच्या घरी येत असत. त्यांचे वागणे आपुलकीचे आहे. त्या मला प्रत्येक कार्यक्रमाला घेऊन जात असत. मला त्यांच्या सहवासात पुष्कळ आनंद होत असे.

४. गुरुमाऊलीची अनुभवलेली कृपा

४ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकण्याची इच्छा होणे; मात्र ‘त्या वेळी सेवा असल्याने मार्गदर्शनाला जाता येणार नाही’, या विचाराने निराश होणे : त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांसाठी गावोगावी मार्गदर्शन असायचे. एकदा त्यांचे नाशिक येथे मार्गदर्शन होते. त्या वेळी मला त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जायचे होते; पण मला एका साधिकेच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन करायचे होते. त्यामुळे मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्यक्रमाला जाता येणार नव्हते. तेव्हा मी फार निराश झाले.

४ आ. बहिणीने सांगितल्यानुसार सकाळी सहसाधिकेच्या मुलाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम करणे आणि रात्री घरी गेल्यावर बहिणीने ‘साधिकांना तुझ्या समवेत नाशिक येथे जायचे आहे’, असे सांगणे : मी घरी आल्यावर माझ्या बहिणीला (कै. हिरा जाधव यांना) याविषयी सांगितले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘आपण यातून मार्ग काढूया. तू वाढदिवसाचा कार्यक्रम सकाळी लवकर आटोपून घे आणि रात्री घरी ये.’’ बहिणीने सांगितल्याप्रमाणे मी वाढदिवसाचा कार्यक्रम करून रात्री घरी आले. तेव्हा बहिणीने मला सांगितले, ‘‘दोन साधिका घरी आल्या होत्या. त्यांना तुझ्या समवेत उद्या नाशिक येथे जायचे आहे. सकाळी तुम्ही नाशिकला जाऊ शकता. तुला परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाला जाता येईल.’’

४ इ. आम्ही नाशिक येथे पोचलो. आमची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही येणार नाही’, असे कळले होते.’’ माझ्या डोळ्यांतील अश्रू पाहून ते म्हणाले, ‘‘तुम्ही कार्यक्रमाला आलात ना ! तुमची इच्छा पूर्ण झाली ना !’’ ही आहे गुरुमाऊलीची कृपा !

५. सेवानिवृत्त होतांना मिळालेल्या वेतनाचा धनादेश परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अर्पण करणे; मात्र त्यांनी तो धनादेश सविनय परत देणे आणि त्यांच्या या कृतीतून त्यांचा लक्षात आलेला द्रष्टेपणा !

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला ‘आता तुम्हाला याची आवश्यकता आहे’, असे सांगून धनादेश परत देणे : मी सेवानिवृत्त होतांना मला मिळालेल्या वेतनाचा धनादेश (चेक) परात्पर गुरु डॉक्टरांना अर्पण केला. तेव्हा ते धनादेश हातात घेऊन म्हणाले, ‘‘आता तुम्हाला याची आवश्यकता आहे. हा तुमच्याकडेच ठेवा. मला धनादेश मिळाला असे समजा.’’ तेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू आले. मला काहीच बोलता येईना.

५ आ. साधिकेच्या भावाने धनादेशाच्या रकमेत स्वतःचे पैसे घालून धर्मप्रचाराच्या कार्यासाठी चारचाकी गाडी घेणे आणि साधिकांना प्रचारसेवेतील आनंद घेता येणे : मी घरी आले आणि भावाला (कै. जगन्नाथ चव्हाण याला) धनादेश दाखवला. तेव्हा भाऊ म्हणाला, ‘‘परम पूज्य ईश्वरी अवतार आहेत. आता या धनादेशात आमच्याकडून थोड्या पैशांची भर घालतो. आपण चारचाकी गाडी घेऊया.’’ त्याप्रमाणे भावाने मला चारचाकी गाडी घेऊन दिली. त्यामुळे आम्हाला साधिकांना समवेत घेऊन लहान लहान गावांत जाऊन धर्मप्रचार करणे सोपे झाले. साधिका आनंदाने प्रचाराला येत असत. त्यांना सेवेतील आनंद मिळायचा. त्या सेवा करून घरी गेल्यावर आनंदाने घरकाम करायच्या.

६. साधिका पूर्णवेळ साधना करू लागणे आणि तिने सेवेसाठी घेतलेली चारचाकी गाडी आश्रमाला अर्पण करणे

मी एका साधिकेच्या समवेत (श्रीमती सुलभा मालखरे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८२ वर्षे यांच्या समवेत) रामनाथी, गोवा येथील सनातचा आश्रम पहाण्यासाठी गेले होते. आम्ही आश्रम पाहिला. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही आश्रमातच राहिलो. सेवेसाठी घेतलेली वैयक्तिक चारचाकी गाडी मी आश्रमात अर्पण केली.

७. प्रार्थना आणि कृतज्ञता !

मी सनातनच्या सेवेत राहिल्याने मला परम पूज्यांचे दर्शन झाले आणि आजन्म सनातनच्या सेवेत रहाण्याचे भाग्य लाभले. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे कृपाछत्र आम्हा सर्व साधकांवर असेच राहो’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. माझ्याकडून ही सूत्रे लिहून घेतल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती विजयालक्ष्मी रामजी चव्हाण, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जून २०२२)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.