ठग दांपत्याला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

‘धनरेषा अर्बन’मध्ये ९६ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण

चिपळूण (जि. रत्नागिरी) – तालुक्यातील खेर्डी येथील ‘धनरेषा अर्बन निधी लि.’मध्ये ९६ लाख रुपयांचा घोटाळा करून पसार झालेल्या राहुल भगत आणि सौ. प्रियंका भगत या दांपत्याला
पोलिसांनी पुण्यात अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उपस्थित केले असता २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वर्ष २०२० पासून खेर्डी येथे धनरेषा अर्बन निधी लि. कार्यरत होती. यामध्ये राहुल भगत आणि सौ. प्रियंका भगत हे पती-पत्नी कार्यरत होते.  या कंपनीत येणार्‍या ग्राहकांना आकर्षक दामदुप्पट ठेवींसह, तसेच संचालकपदी वर्णी लावतो, अशी आमिषे हे पती-पत्नी यांनी ग्राहकांना दाखवली होती. ग्राहक आकर्षित होत असल्याच्या संधीचा लाभ उठवत दोघांनी ९६ लाख रुपयांचा घोळ करून ग्राहकांची फसवणूक केली.

या प्रकरणी फसलेल्या २४ ग्राहकांनी हा घोटाळा पुढे आणत चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर भगत पती-पत्नीवर गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा नोंद होताच हे दांपत्य येथून पसार झाले होते. त्या दोघांचा शोध घेत असतांनाच पोलिसांना ते पुणे-हवेली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

अशा घोटाळेबाजांवर ठोस कारवाई होऊन कठोर शिक्षाच व्हायला हवी !