सिंधुदुर्गामध्ये आर्.टी.ओ. कार्यालयाचा भ्रष्ट कारभार, ११६ वाहनांची बोगस नोंदणी !

मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ११६ वाहनांची बोगस नोंदणी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या वाहनांचे शुल्क आणि कर यांचा २० कोटी रुपयांचा निधी शासनाकडे जमा झाला नसल्याची गंभीर गोष्ट मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. कुडाळमधील आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली ? याविषयीचा तारांकित प्रश्न २७ डिसेंबर या दिवशी सभागृहात उपस्थित केला होता.

वर्ष २०१७ ते २०२० या कालावधीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी खासगी आस्थापनातील ३ जणांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला असून उपप्रादेशिक परिवहन विभागातील ५ कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले. यावर भास्कर जाधव यांनी ही सर्व वाहने रस्त्यांवर फिरत असल्याची माहिती दिली. त्यावर मंत्री देसाई यांनी वाहनांची नोंदणी रहित करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्याचे सांगितले. निलंबित कर्मचार्‍यांना शासन नियमाप्रमाणे ६ मासांनी कामावर पुन्हा घेण्यात आले असून अकार्यकारी पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले. (भ्रष्टाचार रोखण्यासाठी भ्रष्ट अधिकार्‍यांवर केवळ ६ मासांकरता निलंबनाची कारवाई करण्याऐवजी कायमस्वरूपी निलंबित करून कायदेशीवर कारवाई व्हायला हवी. यासाठी कायद्यात आवश्यक पालट करावा. – संपादक)