कोरोनावर गुणकारी असलेल्या पंचगव्य चिकित्सेला शासनमान्यता मिळणे आवश्यक ! – डॉ. दिलीप कुलकर्णी, कार्यवाह, जनमित्र सेवा संघ

पुणे येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद २०२२’ समारोप सोहळा

जनमित्र सेवा संघाचे कार्यवाह डॉ. दिलीप कुलकर्णी

भोसरी, २५ डिसेंबर (वार्ता.) – पंचगव्य आधारित ओझोन प्रक्रियेद्वारे उपचार केल्यास कर्करोगासारखा आजार बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे मागील २ वर्षे सारे जग ज्या कोरोनामुळे त्रस्त आहे, त्यावरही पंचगव्य चिकित्सा प्रभावीपणे काम करते; परंतु याला पुढील काळात शासनमान्यता मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘जनमित्र सेवा संघा’चे कार्यवाह डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी केले. ते कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गो परिषद २०२२’च्या समारोपीय दिवसाच्या प्रथम सत्रात बोलत होते. डॉ. दिलीप कुलकर्णी आणि डॉ. ज्योती मंडर्गी यांनी ‘पंचगव्य आणि त्याचे शास्त्रीय महत्त्व’ याविषयी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. विश्व हिंदू परिषद क्षेत्र प्रचारक भाऊराव कुदळे, रमेश भाई रूपालिया यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चे राजेंद्र फडके यांनी समारोपीय मार्गदर्शन केले.

सन्मान स्वीकारतांना उजवीकडून दुसरे डॉ. मार्कन्डेय आणि जनमित्रचे पदाधिकारी

श्री.श्री.श्री. प.पू. १००८ यति अनिरुद्धतीर्थ स्वामीजी यांनी सकाळी ११.३० वाजता सुरभी यज्ञाची यजमानांच्या हस्ते पूर्णाहुतीने सांगता केली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शन कक्षावर संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने शेती फवारणी करणार्‍या स्वयंचलित यंत्रापासून गो-आधारित आणि नैसर्गिक शेतीवर आधारित उत्पादने उपलब्ध होती. त्याचाही जनतेला मोठ्या प्रमाणात लाभ झाला.

या वेळी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चे राजेंद्र फडके यांनी समारोपीय भाषणात सांगितले की, ज्यांनी या परिषदेच्या यशस्वीतेसाठी सहभाग घेतला, त्यांचा मी ऋणी आहे. गायीला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या दृष्टीने पहायला हवे. या परिषदेतून सर्वांनाच पुष्कळ शिकायला मिळाले. आपण आपल्यातील विकृती दूर करून संस्कृतीकडे जात आहोत. गोमाता आणि भगवान (देव) यांवर विश्वास ठेवून काम केले, तर ते यशस्वी होते. आपल्याला पुष्कळ ज्ञान असण्याची आवश्यकता नाही.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले आणि राष्ट्रगीताने महोत्सवाची सांगता झाली.

मान्यवरांचे विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

१. या वेळी डॉ. विद्याधर वैद्य यांनी ‘प्राचीन हवामान शास्त्र’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

२. श्री. राजीव देवकर यांनी यज्ञ, पाऊस, वादळ पंचक्रोशीतील अंदाज आणि गोसंगोपन करतांना गावातील प्रत्येक नागरिकाने कसे प्रयत्न करावे ? याविषयी मार्गदर्शन केले.

३. डॉ. मार्कन्डेय यांनी गोरक्षा आणि गोशाळा व्यवस्थापन कसे असले पाहिजे ? याविषयी माहिती दिली.

४. डॉ. योगी यांनी गोशाळेसाठी वित्तीय प्रबंधन कसे असायला हवे ? आणि त्यामध्ये कसे पालट करणे अपेक्षित याविषयी सांगितले.

५. डॉ. ज्योती मुंडर्गी यांनी गोमूत्रामधील असणारे घटक याचे शास्त्रीय विश्लेषण केले. विदेशी गाईचे दूध पिऊन कर्करोग होतो. यावर मात करायची असेल, तर देशी गाईचे पालन होणे आवश्यक तर आहेच ; पण पंचगव्य चिकित्सा घराघरांत पोचली पाहिजे, असे सांगितले.

६. डॉ. चव्हाण यांनी गोशाळा आणि गोआधारित शेती, तर जळगाव येथील डॉ. बन्सीलाल जैन यांनी पंचगव्य चिकित्सा यांविषयी माहिती दिली.

७. श्री. संजय पांडे यांनी गोरक्षेविषयी विचार मांडले.

 वैशिष्ट्यपूर्ण

भारतीय गोवंश संवर्धन विशेषज्ञ, तसेच आध्यात्मिक प्रवक्ता आचार्य पुरुषोत्तम ‘श्रीवत्स’ यांनी सनातनच्या कक्षाला भेट दिली आणि ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली.

कोषाध्यक्ष थिटे यांनी काही ठराव वाचून दाखवले आणि उपस्थितांनी त्याला अनुमोदन दिले.

१. गोसेवा आयोगाची स्थापना करावी.

२. ‘कामधेनू विद्यापिठा’ची स्थापना करावी.

३. ‘मल्टीनॅशनल कंपन्यां’ना सी.एस्.आर्.मधून साहाय्य देण्याची अनुमती द्यावी.

४. प्रत्येक गायीसाठी ठराविक रक्कम ‘चारा मदत’ म्हणून द्यावी.

५. गोचर भूमी गायीसाठी राखीव ठेवावी.