विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या प्राध्यापकाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोटा (राजस्थान) – ‘राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटी’मध्ये शिकणार्‍या एका ‘बी.टेक’ विद्यार्थिनीने आरोप केला आहे की, गिरीश परमार नावाच्या प्राध्यापकाने परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. या  प्राध्यापकाने तिला प्रथम अंतिम वर्षाच्या अर्धवार्षिक (सेमिस्टर) परीक्षेत अनुत्तीर्ण केले. यानंतर विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. अर्पित अग्रवाल हा विद्यार्थी प्राध्यापकाचा प्रस्ताव पीडित विद्यार्थिनीपर्यंत पोचवत होता. पीडित विद्यार्थिनीने सर्व प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर प्राध्यापक गिरीश परमार आणि अर्पित अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली.

१. प्राध्यापकाने अनेक विद्यार्थिनींना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. अर्पितच्या माध्यमातून या प्राध्यापकाने इतर काही विद्यार्थिनींना परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे आश्‍वासन देऊन त्यांच्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. आणखी एका विद्यार्थिनीने या प्राध्यापकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे.

२. ४७ वर्षीय प्राध्यापक गिरीश परमार हा ‘आयआयटी’ असून सुवर्णपदक विजेता आहे. (उच्चशिक्षित असो वा अल्प शिक्षित नीतीमत्ता न शिकवली गेल्याचा हा परिणाम आहे, हेच यातून अधोरेखित होते ! – संपादक) विद्यापिठाने यापूर्वी विद्यार्थिनींनी प्राध्यापकाच्या विरोधात केलेल्या तक्रारी  फेटाळून लावल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

संपादकीय भूमिका

  • असे प्राध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !