ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील अतिक्रमण हटवण्याची लिंगायत संघटनांची मागणी !

सोलापूर – येथील ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील दोन्ही रस्त्यांना गटाराचे घाण पाणी आणि अतिक्रमण यांचा विळखा पडला आहे. हे अतिक्रमण २ दिवसांत काढण्यात यावे आणि पादचारी मार्गासह वाहतुकीला रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करू, अशी चेतावणी ‘सकल लिंगायत महासमिती’चे राज्य समन्वयक डॉ. बसवराज बगले यांच्यासह लिंगायत संघटनांच्या प्रमुखांनी दिली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल उगले आणि पोलीस आयुक्त यांना डॉ. बसवराज बगले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे यांनी याविषयीचे निवेदन सादर केले. (महापालिका प्रशासनाला ड्रेनेजचे पाणी आणि अतिक्रमण दिसत नाही का ? ‘प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरासमोर मागील २ मासांपासून गटाराचे पाणी, घाणीचे साम्राज्य, लाकडी आणि लोखंडी फर्निचर विक्रीला ठेवणे या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अवैध अतिक्रमणांमुळे या परिसरात एकेरी वाहतूक होत आहे. मंदिरासमोरचे अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी शहरातील, तसेच तालुक्यातील सहस्रो भाविक प्रतिदिन येत असतात. येत्या काही दिवसांमध्ये असलेल्या ‘गड्डा यात्रे’ची सिद्धताही चालू झाली आहे. मंदिर परिसर भक्तांनी गजबजणार आहे. या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजातील पदाधिकार्‍यांनी या गंभीर विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.