आय.एन्.एस्. मुरगाव भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू !

आय.एन्.एस्. मुरगाव

मुंबई – ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ येथे बांधण्यात आलेली ‘कोलकाता’ श्रेणीतील आय.एन्.एस्. मुरगाव ही दुसरी युद्धनौका १८ डिसेंबर या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे. मुंबई येथील नौदलाच्या तळावर युद्धनौकेवर भारतीय नौदलाचा झेंडा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते फडकावण्यात आला. आय.एन्.एस्. विशाखापट्टणम् नंतर सर्वांत अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली आय.एन्.एस्. मुरगाव ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम युद्धनौका आहे. या समारंभाला तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख (सी.डी.एस्.) जनरल अनिल चौहान, नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल आर्. हरि कुमार, गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आय.एन्.एस्. मुरगावची वैशिष्ट्ये 

आय.एन्.एस्. मुरगाव ही ब्राह्मोस, बराक क्षेपणास्त्र (मिसाईल), दोन प्रकारच्या तोफा, अत्याधुनिक एम्.एफ्. स्टार रडार, हायटेक इलेक्ट्रिकल युद्धप्रणाली (वॉरफेअर सिस्टिम) स्वदेशी रॉकेट लाँचर, सागरी देखरेख रडार यांनी सुसज्ज आहे. त्याशिवाय आकाशात मारा करणारे मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा या युद्धनौकेवरून करता येऊ शकतो. आक्रमणाची आगाऊ सूचना देणारी यंत्रणासुद्धा या युद्धनौकेवर आहे. या नौकेतील ७६ टक्के यंत्रणा भारतीय बनावटीची आहे. ‘शौर्य, पराक्रम आणि विजयी भव’ ही आय.एन्.एस्. मुरगावची युद्धघोषणा आहे. ‘प्रोत्साहित आणि मोहिमेस सज्ज’ असे आय.एन्.एस्. मुरगावचे ब्रीदवाक्य आहे.

नौदलाच्या माध्यमातून गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला दिलेली ही मानवंदना ! – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

युद्धनौका ही आपली शक्ती आहे. युद्धनौका सिद्ध करण्यासाठी परिश्रम घेणार्‍यांचे कौतुक असून आम्ही त्यांचे आभार मानतो. भारतीय नौदलात आय.एन्.एस्. मुरगाव मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्‍वास आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुष यांचा इतिहास आहे. अशा या राज्यात आय.एन्.एस्. मुरगाव सेवेत रुजू होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. ‘मुरगाव’ या नावामागे गोवा मुक्ती संघर्षाचा इतिहास आहे. नौदलाच्या माध्यमातून गोव्यात लोकशाहीसाठी झालेल्या लढ्याला दिलेली, ही मानवंदना आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ‘मेक इन् इंडिया’ अंतर्गत भारतासाठी नाही, तर पुढे जगासाठी आपण युद्धनौका बनवू, असा विश्‍वास संरक्षणमंत्री सिंह यांनी व्यक्त केला.