‘निजामुद्दीन एक्सप्रेस’चे नामकरण ‘ताराराणी एक्सप्रेस’ असे करण्याची राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद संघटनेची निवेदनाद्वारे मागणी !

कोल्हापूर रेल्वे अधिकारी विजयकुमार यांना निवेदन देतांना जनसंसद संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

कोल्हापूर – राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद यांच्या वतीने करवीर राज्य संस्थापिका महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ‘हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस’चे नामकरण महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या नावे ‘ताराराणी एक्सप्रेस’, असे करावे, अशी मागणी कोल्हापूर रेल्वे अधिकारी विजयकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रसंगी जनसंसद संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील-बेनाडीकर, माजी उपाध्यक्ष रवींद्र धडेल, रमेश स्वामी, महिला प्रदेशाध्यक्ष स्वाती पिसाळ, राज्य संघटक शाहूराजे डफळे, ‘दुर्ग संवर्धन’चे अध्यक्ष रणजित घरपणकर, करवीर तालुका महिला अध्यक्ष गीतांजली माने यांसह अन्य उपस्थित होते.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वराज्य बुडवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला याच मातीत म्हणजे महाराष्ट्रात महाराणी छत्रपती ताराराणी यांनी गाडले, हा इतिहास आहे. परकियांनीसुद्धा या राणीचा गौरव गौरवपूर्ण शब्दांत केला आहे. तरी प्रत्येक मंगळवारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून निघणार्‍या १२१४७ या क्रमांकाच्या गाडीस ‘महाराणी ताराराणी एक्सप्रेस’, असे नाव देण्यात यावे.