‘श्री. उत्तम गुरव यांच्याबद्दल त्यांची मुले आणि जावई यांनी लिहिलेला लेख येथे दिला आहे. तो लेख वाचून ‘एखादे वडील आणि सासरे इतके चांगले आहेत’, हे पहिल्यांदाच समजले. त्याबद्दल त्यांचे आणि त्यांची मुले अन् जावई यांचे अभिनंदन !
‘श्री. उत्तम गुरव, त्यांची मुले आणि जावई या सर्वांची साधनेत जलद प्रगती व्हावी’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !’ ‘आपले आई-वडील, भाऊ, सून, जावई किंवा इतर कुणी नातेवाईक इतके चांगले आहेत’, असे कुणाच्या लक्षात आले असेल, तर त्यांनी ते खालील पत्त्यावर जरुर कळवावे. समाजालाही त्या लेखांतून काही शिकता येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२४.१०.२०२२) टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१ संगणकीय पत्ता – [email protected] |
नंदीहळ्ळी, बेळगाव येथील श्री. उत्तम गुरव यांची त्यांची मुले आणि जावई यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. श्री. सुकेश गुरव (मोठा मुलगा) नंदीहळ्ळी, बेळगाव, श्री. कुशल गुरव (मधला मुलगा) आणि सौ. रोहिणी वाल्मिक भुकन (धाकटी मुलगी, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. स्वावलंबी : ‘आमचे बाबा स्वतःची सर्व कामे स्वतःच करतात. ते कुणालाच त्यांची सेवा करू देत नाहीत. त्यांना काही हवे असल्यास ते स्वतः उठून घेतात. ते रुग्णाईत असल्यासही त्यांना शक्य होतील तेवढी स्वतःची कामे स्वतःच करतात. त्यांना फारच अडचण असल्यास ते इतरांना साहाय्य करायला सांगतात. ‘स्वतःमुळे कुणाला त्रास होऊ नये’, असा त्यांचा विचार असतो.
१ आ. व्यवस्थितपणा
१. त्यांचा पोशाख नीटनेटका असतो.
२. ते प्रत्येक वस्तू ठरलेल्या ठिकाणीच ठेवतात. आम्ही कधी पाईप किंवा अवजारे व्यवस्थित ठेवली नाहीत, तर त्याविषयी ते आम्हाला सांगतात.
३. ते घरासमोरील परिसर नियमितपणे स्वच्छ करतात. आमच्या घरी काही कार्यक्रम किंवा सत्संग असेल, तर ते घराची स्वच्छता करतात. आमचे घर मोठे आहे. ते सर्व नियोजन करून त्या त्या वेळी घराची स्वच्छता करतात.
४. ते शेतातील फळे खोक्यात व्यवस्थित ठेवून आश्रमात पाठवतात.
१ इ. काटकसरी
१. बाबा प्रत्येक वस्तूचा उपयोग आवश्यक तेवढा आणि योग्य रितीने करतात. ते पैशांचा हिशोब व्यवस्थित लिखित स्वरूपात ठेवतात.
२. ‘देवाने आपल्याला एवढे दिले आहे, तर आपण कृतज्ञताभावात राहून वापरूया’, असा त्यांचा विचार असतो. आमच्याकडे कोणतीही गोष्ट आवश्यकता पाहून तेवढीच आणली जाते, तसेच त्या वस्तूचा १०० टक्के उपयोग केला जातो. शेतातील झाडांना पाणी देतांना ‘पाणी वाया जाणार नाही’, याची ते काळजी घेतात.
१ ई. सतर्कता
१. घरात काही वस्तूचा आवाज झाला किंवा गॅसचा वास आला, तर ते आम्हाला सतर्क करतात, उदा. गॅस गळती, ‘शॉर्ट सर्किट’, इत्यादी.
२. ते कितीही व्यस्त असले, तरीही बाहेर जातांना ‘वाहन चालवण्याचा परवाना, अन्य कागदपत्रे, शिरस्त्राण (हेल्मेट), पाण्याची बाटली इत्यादी वस्तू घेतल्या आहेत ना ?’, याची निश्चिती करतात.
१ उ. इतरांचा विचार करणे : बाबांनी काही औषधी वनस्पती लावल्या आहेत. आमच्या घरी कुणी साधक किंवा पाहुणे आले, तर बाबा त्यांना औषधी वनस्पतींची माहिती देतात, तसेच त्यांचे महत्त्व सांगतात. ‘येणार्या आपत्काळात सर्वांना औषधी वनस्पतींची माहिती असावी’, असा बाबांचा विचार असतो. बाबा त्यांना काही औषधी वनस्पती देतात आणि त्यांच्या घरी लावायला सांगतात.
१ ऊ. बाबा वारकरी संप्रदायानुसार पूजा-पाठ करतात. ते सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनाही करतात. ते प्रामाणिकपणे साधनेचे प्रयत्न करतात.
१ ए. सेवेची तळमळ : बाबा त्यांच्या ओळखीच्या वारकर्यांना सनातन संस्थेने सांगितलेल्या साधनेविषयी सांगतात. बाबा त्यांना आगामी आपत्काळाविषयी अवगत करतात.
१ ऐ. मुलांना पूर्णवेळ साधना करण्यास साहाय्य करणे : बाबांनी आम्हाला लहानपणापासून साधना शिकवली. त्यांनी आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी साहाय्य केले आणि प्रोत्साहन दिले. बाबा शेतातील कामे करतात. ते कठीण कामे कामगारांकडून करून घेतात. त्यामुळे आम्हाला शेतीत लक्ष द्यावे लागत नाही. आम्ही आश्रमात राहून निश्चिंतपणे साधना करू शकतो.
१ ओ. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवल्यानंतर झालेले पालट
१ ओ १. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यावर स्वभावात पालट होणे : बाबा पूर्वी रागीट होते. त्यांना घरातील व्यक्ती, तसेच शेजारी घाबरायचे. त्यांच्यामध्ये अहं पुष्कळ होता. त्यांच्यामध्ये ‘मला जमते. माझ्याविना काही होणार नाही. सर्वांनी मला विचारायला पाहिजे’, असे तीव्र अहंचे पैलू होते. त्यांची साधना वाढत गेली आणि त्यानंतर त्यांच्या स्वभावात पालट झाला. त्यांना स्वतःच्या ज्या काही चुका समजल्या, त्यावर त्यांनी गांभीर्याने प्रयत्न केले.
१ ओ २. अहं अल्प होणे : बाबांमध्ये पूर्वीपेक्षा अहं अल्प झाल्याचे जाणवतो. त्यांना आता स्वतःचे मत असे काही नसते. ‘इतरांसाठी मी काय करू शकतो ?’, असा ते विचार करतात. बाबा आईला घरातील कामात साहाय्य करतात.
१ औ. भाव
१ औ १. फुलझाडांप्रती कृतज्ञता वाटणे : ते सकाळी अंघोळ झाली की, फुलांच्या बागेत जाऊन फुलांना प्रार्थना करून फुले खुडतात. ते फुलझाडांची काळजी घेतात. त्यांना फुलझाडांप्रती कृतज्ञता वाटते. ते झाडांशी एकरूप होऊन झाडांशी बोलतात.
१ औ २. फुलांची सजावट आणि पूजा भावपूर्ण करणे : बाबा सकाळी लवकर उठून आवरून वारकरी संप्रदायानुसार पूजा-अर्चा करतात. ते पूजा इतकी सुंदर करतात की, ती पाहिल्यानंतर आमचा भाव जागृत होतो. ते फुलांची सजावट भावपूर्ण करतात. त्यातून आम्हाला पुष्कळ चैतन्य मिळते. घरी आलेले पाहुणे आणि साधक यांनी ‘तुमच्या घरातील देवघर पाहिल्यानंतर भाव जागृत होतो’, असे सांगितले.
१ औ ३. ‘नामजपामुळे देह शुद्ध होऊन जीवनाचे कल्याण होते’, असा भाव असणे : बाबा प्रत्येक वर्षी श्रावणमासात मोठ्या वहीत ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप लिहितात. त्यांचे अक्षर एकसारखे आणि सात्त्विक आहे. त्यातून चांगली स्पंदने येतात. ‘नामजपामुळे आपला देह शुद्ध होऊन जीवनाचे कल्याण होते’, असा त्यांचा भाव असतो.
१ औ ४. बाबांना संत आणि साधक भेटल्यावर किंवा त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोलल्यावर आनंद होतो. संतांशी बोलतांना बाबांचा भाव जागृत होतो.’
२. श्री. वाल्मिक भुकन (जावई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. ‘आमचे नाते (सासरे आणि जावई असे नसून) वडील आणि मुलगा असे आहे.
२ आ. गुरुंप्रती श्रद्धा : मुलीचे लग्न करण्यापूर्वी मुलीचे आई-वडील मुलाची सर्व माहिती विचारून घेतात; पण बाबांनी मला लग्नाआधी किंवा आताही माझ्या आर्थिक स्थितीविषयी काहीच विचारले नाही. त्यांची गुरूंवर दृढ श्रद्धा आहे. मी (जावई) साधक आहे. त्यामुळे त्यांना जराही काळजी वाटत नाही. ‘देव सर्व करील’, असे म्हणून त्यांनी आमचे लग्न लावून दिले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २.५.२०२२)