गोव्यात ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ११ डिसेंबरला होणार समारोप

गोव्यात ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचे उद्घाटन

पणजी, ८ डिसेंबर (पसूका) – केंद्रीय पर्यटन आणि नौका, बंदरे अन् जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या उपस्थितीत ८ डिसेंबरला ९ व्या जागतिक आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शन २०२२ यांचे पणजी, गोवा येथे उद्घाटन करण्यात आले.  यामध्ये ५३ देशांतील ४०० विदेशी प्रतिनिधींसह ४ सहस्र ५०० हून अधिक व्यक्ती  सहभागी होणार आहेत. आरोग्य प्रदर्शनात २१५ हून अधिक आस्थापने, आघाडीचे आयुर्वेद ‘ब्रँड्स’, औषध उत्पादक आणि आयुर्वेदाशी संबंधित शैक्षणिक अन् संशोधन आणि विकास संस्था सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप समारंभाला उपस्थित रहाणार आहेत.

१. उद्घाटन समारंभात राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘वर्ष २०१४ मध्ये भारत सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन केल्यामुळे आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर विस्तार झाला. वर्ष २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. जगभरातील नागरिकांना आता त्याचा लाभ होत आहे.’’

२. गोव्यात परिषदेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रशासनाचे आभार मानले.

३. आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले, ‘‘गेल्या ८ वर्षांमध्ये आयुष मंत्रालयाचा व्याप प्रचंड वाढला आहे. वर्ष २०२२ च्या शेवटपर्यंत आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या संस्थांचा कारभार १० अब्ज डॉलर्सवर पोचेल. कोरोना महामारीच्या व्यवस्थापनामध्ये आयुषचे पुष्कळ मोठे योगदान राहिले आहे. ८९.९ टक्के भारतीय लोकसंख्या कोरोनाचा प्रतिबंध आणि उपचार यांसाठी काही प्रमाणात आयुषवर अवलंबून राहिले.’’

४. या वेळी ‘आयुष्मान’ कॉमिक बुक मालिकेतील तिसर्‍या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले. भारतीय पारंपरिक वैद्यकीय प्रणालीमधील प्रगत अभ्यासाला साहाय्य करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (ए.आय.आय.ए.) आणि जर्मनीच्या ‘रोझेनबर्ग  युरोपियन अ‍ॅकॅडमी ऑफ आयुर्वेद’ यांच्यात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

५. जागतिक स्तरावर आयुष औषध प्रणालीची परिणामकारकता आणि सामर्थ्य यांचे दर्शन घडवणे, तसेच उद्योजक, चिकित्सक, पारंपरिक उपचार करणारे, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी, औषध उत्पादक, औषधी वनस्पतींचे उत्पादक आणि विपणन धोरणकार यांच्यासह सर्व भागधारकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा आयुर्वेद परिषद आणि आरोग्य प्रदर्शन यांच्यामागचा उद्देश आहे.