हिरेबागवाडी पथकर नाक्यावर (जिल्हा बेळगाव) कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न

बेळगाव – येथील हिरेबागवाडी पथकर नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका’ या संघटनेकडून ६ डिसेंबरला महाराष्ट्रातील (पुणे येथून कर्नाटकात जाणार्‍या) ६ ट्रक गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यात काही ट्रकच्या काचा फुटल्या. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत ट्रकवर चढून घोषणाबाजी केली, तसेच महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी चेतावणी दिली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

या प्रकरणी महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘कर्नाटककडून महाराष्ट्रातील ट्रकवर झालेल्या आक्रमणाचा मी निषेध करतो. कर्नाटकने महाराष्ट्रातील जनतेचा अंत पाहू नये. अशा प्रकारची कृत्ये करणार्‍या संघटनांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही कर्नाटककडे करू.’’

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सामंजस्याची भूमिका घेत महाराष्ट्रातील मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६ डिसेंबर या दिवशी बेळगाव येथे जाणे स्थगित केले होते. असे असतांना ‘कन्नड रक्षण वेदिका’ या संघटनेकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्रमक भूमिका घेत चिथावणीखोर भाषा केली जात आहे.