श्रद्धा वालकर हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आफताब याला फाशी द्या !

वसमत (जिल्हा हिंगोली) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने मूक मोर्च्यातील मागणी !

मोर्च्यात महिला, तरुणी आणि तरुण यांची संख्या लक्षणीय

प्रतिकात्मक छायाचित्र

वसमत – ‘देशात अनधिकृतपणे होणारे धर्मांतर आणि लव्ह जिहाद या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करावा, तसेच श्रद्धा वालकर हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून धर्मांध आरोपी आफताब पूनावाला याला फाशीची शिक्षा द्यावी’, या मागण्यांसाठी शहरातून सकल हिंदु समाजाच्या वतीने ४ डिसेंबर या दिवशी ‘विराट मूक मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्च्याला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा मोठा प्रतिसाद लाभला. मोर्च्यात संत, महंत आणि सहस्रो आंदोलक सहभागी झाले होते. मोर्च्याच्या समर्थनार्थ व्यापार्‍यांनीही बाजारपेठ बंद ठेवली होती.

मोर्च्यात गुरुपादेश्‍वर शिवाचार्य स्वामी, महंतय्या महाराज थोरावेकर, चैतन्य भारती महाराज, कल्याण गिरी महाराज, नागनाथ महाराज चव्हाण, नागबाबा महाराज कुंजापुरी आणि नागबाबा रोशनगिरी महाराज सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्च्यात महिला, तरुणी आणि तरुण यांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आल्यावर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील काळात अनेक प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले आहे. हिंदु मुलींना प्रेमाच्या जोळ्यात ओढून त्यांचे बळजोरीने धर्मांतर करण्याचा प्रकार चालू आहे. ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली पळवून नेलेल्या अनेक हिंदु मुलींची हत्या करण्यात आली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा. लव्ह जिहाद प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ‘ही प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र न्यायालयांची स्थापना करावी’, अशी मागणी करण्यात आली.