पुणे येथे ‘झिका’चा रुग्ण आढळला; दक्षतेचे आदेश !

पुणे – पुण्यामध्ये कामानिमित्त आलेल्या ६७ वर्षीय पुरुषाला ‘झिका’चा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. पुण्यात आल्यानंतर रुग्णाला ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागला. रुग्णाने वैद्यकीय सल्ल्याकरता १६ नोव्हेंबर या दिवशी जहांगीर रुग्णालयामध्ये उपचार चालू केले, तर १८ नोव्हेंबर या दिवशी खासगी प्रयोगशाळेत ‘झिका’ झाल्याचे निदान झाले. त्यानंतर रुग्णाच्या रक्ताचा नमुना तपासणीकरता ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’त पाठवण्यात आला. तेव्हा दिलेल्या अहवालामध्ये ‘झिका’चा संसर्ग झाल्याचे अधोरेखित केले, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

राज्याचे साथरोग तपासणी अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, एडीस या डासापासून डेंगी, चिकणगुनीया आणि झिका या ३ आजारांचा संसर्ग होतो. आपल्याकडे ‘एडीस’ डास अधिक प्रमाणात आढळतात. ‘झिका’ या आजाराच्या ८० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे त्याचे निदान लवकर होत नाही.