संभाजीनगर येथील बैठकीत मुख्याध्यापकांच्या तक्रारी !
संभाजीनगर – शाळेच्या मधील सुटीत आणि शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आजूबाजूला टवाळखोरांचे घोळके उभे राहून मुलींची भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढतात. शाळेच्या मैदानांवर रात्री झालेल्या मेजवानीमधील बाटल्यांचे सकाळी खच साचलेले दिसतात. आमच्या शाळेला कुंपण नाही. त्यामुळे रिक्शाचालक शाळेकडे तोंड करून लघुशंका करतात. याची स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रार केली; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, अशी व्यथाच मुख्याध्यापकांनी थेट पोलीस अधिकार्यांसमोर मांडली. त्यातही आम्ही टवाळखोरांची तक्रार केली, तर आमची नावे त्यांना कळणार नाही ना ? असा प्रश्न उपस्थित केल्याने शहरात टवाळखोरांची दहशत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
शहरात गेल्या मासात शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलींसमवेत गंभीर प्रकार घडल्याच्या घटनांमुळे राज्यभर संताप व्यक्त केला गेला. त्यामुळे शहर आणि महाविद्यालये यांतील विद्यार्थी अन् विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेचे सूत्र नव्याने ऐरणीवर आले आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय, महापालिका आणि जिल्हापरिषद येथील शिक्षण विभागांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी बैठक आयोजित केली होती.
संपादकीय भूमिकामुख्याध्यापक वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष करणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. अशाने समाजात कधीतरी कायदा-सुव्यवस्थेचे राज्य येईल का ? कर्तव्यात कुचराई करणार्या संबंधित पोलीस अधिकार्यांना बडतर्फच केले पाहिजे. |