‘हनुमंत दृष्ट काढत आहे’, असा भाव ठेवून स्वतःची मानस दृष्ट काढतांना कु. वेदिका अशोक दहातोंडे (वय १६ वर्षे) हिला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि त्यानंतर तिच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया !

‘ऑक्टोबर २०२० मध्ये एकदा मी स्वतःची मानस दृष्ट काढत होते. मी हनुमंताला प्रार्थना केली, ‘हे हनुमंता, तू माझी दृष्ट काढ. मला कुणाची दृष्ट लागली असेल, तर ती दूर होऊ दे आणि तुझ्या चैतन्याचे संरक्षककवच माझ्याभोवती निर्माण होऊ दे.’ तेव्हा मला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य आणि त्याविषयी माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे दिली आहे.

कु. वेदिका दहातोंडे

१. साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य

१ अ. हनुमानाने साधिकेची दृष्ट काढणे आणि श्रीरामाच्या साधिकेची सेवा करायला मिळाल्याबद्दल त्याने श्रीरामाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे : मी हनुमंताला प्रार्थना केल्यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘थोड्याच वेळात हनुमान तेथे आला. त्याने श्रीरामाला प्रार्थना करून नारळाने माझी दृष्ट काढली आणि त्याने तो नारळ वाढवला. त्याने श्रीरामाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली, ‘हे श्रीरामा, या कलियुगातही तुमच्या साधिकेची सेवा करायला मिळणे, ही तुमचीच चरणसेवा आहे. तुम्ही मला ही चरणसेवा करायला दिल्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

२. साधिकेच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया

२ अ. ‘अष्टसिद्धी प्राप्त असलेल्या आणि नवनिधींचा दाता असलेल्या हनुमंताने दृष्ट काढल्याबद्दल स्वतः किती कृतज्ञ असायला पाहिजे !’, याची जाणीव होणे : अष्टसिद्धी प्राप्त असलेला आणि नवनिधींचा (कुबेराच्या नऊ खजिन्यांचा) दाता असलेला हनुमंत माझ्यासारख्या लहानशा जिवाची सेवा मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होता. ते पाहून ‘अशा उच्चतम दास्यभाव असलेल्या देवाने माझी दृष्ट काढली’, याबद्दल मी किती कृतज्ञ असायला पाहिजे !’, याची मला जाणीव झाली.

२ आ. ‘सेवाभाव आणि दास्यभाव असलेल्या हनुमंतामध्ये अहंचा लवलेशही नाही. मी तर सामान्य जीव आहे.

मी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं अल्प करण्यासाठी किती प्रयत्न केले पाहिजेत ?’, हेच देवाने माझ्या लक्षात आणून दिले.’

– कु. वेदिका अशोक दहातोंडे (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक