शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विमा आस्थापनाच्या अधिकार्‍याला वाहनात कोंबून पोलीस ठाण्यात नेले !

बुलढाणा येथील शेतकर्‍यांना विम्याचे पैसे न दिल्याचे प्रकरण

बुलढाणा – जिल्ह्यातील सवालाख शेतकर्‍यांना पीक विमा आस्थापनांनी लुटले, तसेच मोठा घोळ केला, असा दावा केला जात आहे. भरलेला आणि मिळालेला पीक विमा यांत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना न्याय मिळण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक होत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला, तसेच विमा आस्थापनाचे जिल्हा कॉर्डिनेटर दिलीप लहाने यांना तुपकर यांनी डांबून ठेवले. त्यानंतर त्यांना गाडीत कोंबून शहर पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी लहाने यांच्यासह जिल्ह्यातील १३ तालुका कॉर्डिनेटरविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विमा आस्थापनाच्या राज्याच्या प्रमुख शकुंतला शेट्टी आणि दीपक पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याची मागणी तुपकर यांनी लावून धरली होती. ‘जिल्ह्यातील सवा लाख शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला होता; मात्र विमा आस्थापनाच्या अधिकार्‍यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

संपादकीय भूमिका

अनेक वेळा निवेदन देऊन आणि चर्चा करूनही विमा आस्थापनातील अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्यावर अशी वेळ आली आहे. शेतकर्‍यांना फसवणार्‍या विमा आस्थापनांच्या विरोधात ही जनतेची क्रांतीच्या दिशेने वाटचाल आहे !