प्रेमळ आणि सहजतेने इतरांशी जवळीक साधणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सेवा करणार्‍या कु. योगिता पालन यांच्या आई श्रीमती भारती पालन यांना सर्व जण प्रेमाने ‘अम्मा’ (म्हणजे आई) असे संबोधतात. त्या माझी बहीण सौ. माया पिसोळकर यांच्या शेजारी रहातात. ‘अम्मा’ यांच्या सान्निध्यात काही काळ व्यतीत केल्यानंतर त्यांचे ‘अम्मा’ हे नाव किती सार्थ आहे !’, याची प्रचीती प्रत्येकाला येईल. माझ्या लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्रीमती भारती पालन

१. घर मोठे असूनही आश्रमाप्रमाणे स्वच्छ आणि टापटीप ठेवणे

योगिताताई आश्रमात सेवेला असते. अन्य कुटुंबीयही धर्मप्रसाराची सेवा करत असल्याने दिवसभर व्यस्त असतात. अम्मांनी त्यांचे मोठे ४ खोल्यांचे घर आश्रमाप्रमाणे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले आहे. ‘घर आश्रमच आहे’, असा अम्मांचा भाव असल्याने त्यांच्या घरात आता चांगली स्पंदने जाणवतात. केवळ साधकच नव्हे, तर साधकांचे नातेवाईकही अम्मांच्या नीटनेटकेपणाची वाखाणणी करतात.

२. प्रेमभाव

अधिवक्ता योगेश जलतारे

अम्मांना इतरांना खाऊ घालायला पुष्कळ आवडते. त्या प्रत्येक आठवड्याला काहीतरी नवीन पदार्थ करून शेजारच्या व्यक्तींनाही देतात. त्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने खायला देतात.

३. सहजतेने जवळीक साधणे

अम्मांच्या सान्निध्यात जो येतो, तो त्यांचा होऊन जातो. केवळ साधकच नव्हे, तर शेजारीही अम्मांना भेटायला त्यांच्या घरी जातात. पूर्वी त्यांच्या संकुलात एक गृहस्थ रहायचे. त्यांचा स्वभाव तापट आणि तिरसट होता. ते इतरांशी नीट बोलतील, याची निश्चिती नसायची; मात्र ते अम्मांशी पुष्कळ नम्रतेने बोलायचे. अनेक जणांचे अम्मांशी घरोब्याचे संबंध आहेत.

४. व्यापकता

अम्मांमध्ये पुष्कळ व्यापकता आहे. त्यांच्या घरात कुणीही निःसंकोच वावरू शकतो. त्या वेळप्रसंगी त्यांचे घर साधकांना वापरायला देतात. त्या साधकांना आवश्यक ती सर्व व्यवस्था स्वतः लक्ष देऊन करतात.

५. तत्त्वनिष्ठ

त्या प्रेमळ असल्या, तरीही त्या इतरांना भावनेपोटी हाताळत नाहीत. मुलांकडून झालेल्या चुका त्या मुलांना त्या त्या वेळी लक्षात आणून देतात. कचरा नेणार्‍याने कचरा नेला नसल्यास अम्मा त्याला परखडपणे जाणीव करून देतात. संकुलातील पाणी संपल्यास त्या शेजार्‍यांना पाणी काटकसरीने वापरण्याची जाणीवही प्रकर्षाने करून देतात.

६. नामजपादी व्यष्टी साधना आणि सेवा चिकाटीने करणे

त्या घराची स्वच्छता, स्वयंपाक, धुणी-भांडी आदी कामे करतात. या व्यापातही त्या नामजपादी उपाय करण्यात कधी सवलत घेत नाहीत. त्यात त्यांचे सातत्य असते. त्या घरचे लवकर आवरून आश्रमातही सेवेसाठी येतात.

७. यजमानांच्या आजारपणात त्यांची मनापासून सेवा करणे

अम्मांचे यजमान कै. शंकर पालनकाका त्यांच्या शेवटच्या काही वर्षांत वार्धक्यामुळे आजारी होते. ते स्वतःचे काहीच करू शकत नव्हते. त्या काळात अम्मांनी त्यांची जी सेवा केली, त्याला तोड नाही. अम्मांना प्रतिदिन यजमानांचे अंथरुण-पांघरुण धुवावे लागत असे. काका झोपून असल्याने त्यांच्या शरिरावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. ते वेदनांमुळे रात्रभर विव्हळत असायचे. त्यामुळे अम्मांनाही रात्रभर झोप नसायची. काका रात्री मधेच उठल्यावर ते पडू नयेत, यासाठी त्यांच्याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागायचे. काकांना स्नानासाठी धरून न्यावे लागायचे. कधी अम्मांची मुले घरी नसल्यास अम्मांना हे सर्व करावे लागायचे. काकांच्या शरिराचा पूर्ण भार पेलवून त्यांना स्नानगृहात नेणे, ही अम्मांची मोठी परीक्षा असायची. अम्मांनी यजमानांचे सर्वकाही न कंटाळता केले. अम्मांना अनेक शारीरिक त्रास आहेत; परंतु यजमानांच्या आजारपणात अम्मांनी स्वतःच्या अडचणींकडे लक्ष दिले नाही. धन्य त्यांची पतीसेवा !

अशा विविध गुणांनी युक्त अशा अम्मांचा आम्हाला सत्संग मिळवून दिला, त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे. ‘अम्मांमधील गुण आम्हालाही शिकता येऊन त्याप्रमाणे आमच्याकडून कृती व्हावी’, अशी गुरुचरणी विनम्र प्रार्थना !’

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२२)