सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे १९ वर्षांतील सेवेतील १७ वे स्थानांतर !

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे – १९ वर्षांतील सेवेतील १७ वे स्थानांतर !

मुंबई – दोन मासांपूर्वी आरोग्य विभागातील सेवा आयुक्तालयात आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना पदावरून हटवण्यात आले आहे. अद्याप कोणत्या विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली, हे सरकारकडून घोषित करण्यात आलेले नाही. वर्ष २००५ मध्ये सनदी अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची मागील १९ वर्षांच्या सेवेत हे १७ वे स्थानांतर करण्यात आले आहे.

२९ नोव्हेंबर या दिवशी सरकारकडून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांच्या स्थानांतराचा आदेश काढला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी तुकाराम मुंडे यांची एड्स नियंत्रण कक्ष, राज्य मानवी आयोग यांसारख्या दुय्यम समजल्या जाणार्‍या विभागांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

अन्य अधिकार्‍यांचे स्थानांतर !

‘एम्.एम्.आर्.डी.ए.’चे अतिरिक्त आयुक्त डॉ. व्ही.एन्. सूर्यवंशी यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांची विदर्भ वैधानिक विकास महामंडळावर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांचे परभणी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर, सुनील चव्हाण यांचे पुणे येथे कृषी आयुक्तपदी, एस्.एम्. कुर्तकोटी यांचे भंडारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर, नांदेडमधील देगलूर उपविभागाच्या साहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांचे नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी स्थानांतर करण्यात आले आहे.