‘माझी पत्नी सौ. अंजली जोशी मिरज (जि. सांगली) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करते. सध्या ती काही दिवसांसाठी घरी आली आहे. कार्तिक कृष्ण द्वादशी (२१.११.२०२२) या दिवशी सौ. अंजलीचा ६० वा वाढदिवस झाला. २६.११.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सौ. अंजली हिचा ‘उग्ररथ शांती विधी’ होणार आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. व्यवस्थितपणा
सौ. अंजलीला व्यवस्थित रहायला आवडते. ती प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवते आणि प्रत्येक काम किंवा सेवा व्यवस्थितपणाने करते.
२. कामांची आवड
आमचे फोंडा, गोवा येथे घर आहे. ती घरात असतांना कामे (सेवा) शोधते आणि ती कामे सहजतेने अन् परिपूर्णरित्या पार पाडते. तेव्हा ‘मी ते काम केले’, असा तिच्यात कर्तेपणा नसतो.
३. इतरांकडून अपेक्षा नसणे
तिला कंबरदुखीचा थोडा त्रास आहे, तरी ती घेतलेली सेवा परिपूर्णच करते. तेव्हा ‘इतरांनी साहाय्य करावे’, अशी तिची अपेक्षा नसते. ती नेहमी इतरांना साहाय्य करण्यासाठी प्रयत्नशील असते.
४. साधनेसाठी करत असलेले प्रयत्न
४ अ. चुकांविषयी संवेदनशीलता : सौ. अंजलीकडून चूक झाल्यास ती त्वरित क्षमा मागते. घरात कुणाकडून चुका झाल्या, तर ती त्या चुका मनमोकळेपणाने त्यांच्या लक्षात आणून देते.
४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया राबवणे : ती स्वयंसूचनांच्या सत्रांची वेळ काटेकोरपणे पाळते. तेव्हा ती कोणतीही सेवा करत असली, तरी ती थांबवून स्वयंसूचनांचे सत्र पूर्ण करते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया (स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं न्यून करण्यासाठी नियमितपणे सारणीत चुका लिहून त्यावर मनाला स्वयंसूचना घेणे) करायला सांगितली आहे’; म्हणून प्रक्रिया करून ती त्याचा आनंदाने आढावा देते.
४ इ. सतत सेवारत रहाणे : ‘सतत कार्यरत रहाणे’, हा तिचा गुण आहे. ‘आता ६० व्या वर्षीही ती तरुणांना लाजवेल’, अशी सेवा करते. रामनाथी आश्रमात ‘सतत सत्सेवेत रहाता यावे’, यासाठी ती प्रयत्न करते. सेवा मिळण्याची वाट न पहाता ती स्वतःच सेवा शोधून त्या करते. ‘दिसेल ते कर्तव्य’, हे सूत्र ती तंतोतंत पाळते. घरातील कामे करतांनाही ती गुरुसेवेत कधीही तडजोड करत नाही, हे विशेष उल्लेखनीय आहे. ‘श्री गुरूंनीच तिची क्षमता वाढवण्यासाठी तिला हे गुण दिले आहेत’, असे मला वाटते.’
– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६६ वर्षे), फोंडा, गोवा. (७.७.२०२२)
वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या ‘उग्ररथ शांती विधी’च्या निमित्ताने सौ. अंजली अजय जोशी यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !
‘कार्तिक कृष्ण द्वादशी (२१.११.२०२२) या दिवशी मला ६० वर्षे पूर्ण झाली. आज (२६.११.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘उग्ररथ शांती विधी’ होत आहे. त्यानिमित्त मी श्री गुरुचरणी कृतज्ञतापुष्पे अर्पण करते. माझ्या जीवनात साधनारूपी फूल उमलण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्यावर केलेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.
१. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेने माझा हिंदु धर्मातील एका आध्यात्मिक कुटुंबात जन्म झाला. त्यांच्या कृपेने माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार केले. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
२. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेने मी अनेक अपघातांतून वाचले आणि माझा मृत्यूयोग टळला. त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
३. ते माझ्याकडून गुरुकृपायोगानुसार नामसाधना करून घेत आहेत, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
४. त्यांच्या कृपेने मला सेवेच्या माध्यमातून अनेक संत आणि साधक यांचा सत्संग लाभला, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
५. त्यांच्या कृपेने आमच्या संपूर्ण कुटुंबाला साधना आणि सेवा यांची गोडी लागली अन् आम्ही पूर्णवेळ साधना करण्यासाठी उद्युक्त झालो, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
६. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात ‘गुरुकृपा होण्यासाठी मनशुद्धी आणि चित्तशुद्धी होणे अत्यंत आवश्यक आहे अन् ती करायलाच हवी’, अशी जिद्द निर्माण झाली, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
७. गुरुदेवांच्या कृपेने मी सांसारिक सुख पूर्ण उपभोगले. त्यांच्या कृपेने माझे आध्यात्मिक आनंदाकडे मार्गक्रमण होत आहे, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !
मी जीवनातील प्रत्येक क्षणी कृतज्ञता व्यक्त केली, तरीही अल्पच आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, तुम्ही मला अखंड कृतज्ञताभावात ठेवलेत. ‘या जिवाची कृतज्ञतारूपी पुष्पांजली आपल्या चरणी समर्पित करून घ्यावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’
– सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज (१५.११.२०२२)