राज्य सरकारने ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – मिलिंद एकबोटे, समस्त हिंदु आघाडी

श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनांचे आंदोलन

समस्त हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे

पुणे – शिंदे-फडणवीस सरकारकडून मला एक अपेक्षा होती ती म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे अफझलखानाचे थडगे उचकटून काढले, त्याप्रमाणे ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करावा; परंतु ती अपेक्षा अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लव्ह जिहाद विरुद्ध एक चांगला कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा, अशी मागणी राज्याच्या जनतेच्या वतीने मी राज्य सरकारकडे करत आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहे; मात्र सर्व गोष्टी कायद्याने घडणार नाहीत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापले दायित्व पार पाडले पाहिजे. कुणीही प्रेमाच्या खोट्या जाळ्यात फसू नये. हिंदु धर्माच्या लोकांनी हिंदु धर्माचा अभिमान बाळगण्याची आवश्यकता आहे, असे परखड मत समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केले. ते देहली येथील श्रद्धा वालकर हत्येच्या निषेधार्थ १९ नोव्हेंबर या दिवशी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले, त्या वेळी बोलत होते.