कार्तिकी एकादशीला सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने…
भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून वर्ष २०२१ च्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली. या मोहिमेच्या अंतर्गत साधकांना घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करण्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रबोधन करण्यात आले. या वर्षी कार्तिकी एकादशीला या मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात या भागातील साधकांनी गेल्या वर्षभरात केलेले प्रयत्न पाहू.
१. ‘लागवड’ या विषयावरील सनातनच्या ग्रंथांचे वितरण करणे
‘सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू झाल्यावर सर्वप्रथम औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी माहिती देणारे सनातनचे ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ आणि ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’, हे किती साधकांकडे आहेत, याचा आढावा घेतला, तसेच ज्या साधकांना ग्रंथ हवे होते, त्यांना समयमर्यादा ठरवून ग्रंथ उपलब्ध करून दिले. सर्व साधकांना या ग्रंथांचे वाचन करण्यास सांगितले, तसेच या विषयासंबंधी साधकांच्या शंकाही लिहून घेतल्या.
२. लागवडीसंबंधी एकत्र अभ्यास करणे
‘लागवड करण्यासाठी कोणत्या साधकांकडे किती जागा आहे ? अल्प जागेत लागवड करण्यासाठी कोणती उपाययोजना करावी ? उपलब्ध जागेत कोणत्या झाडांची प्राधान्याने लागवड करावी ?’, याचा सर्व साधकांनी एकत्र मिळून अभ्यास केला. त्यामुळे ‘प्रत्येक साधक किती आणि कोणती लागवड करणार ?’, हे स्पष्ट झाले. ‘ठरवल्याप्रमाणे लागवड करण्यासाठी जी रोपे विकत आणावी लागणार होती, ती कुठे विनामूल्य मिळू शकतील का ?’, हे शोधले. काही रोपवाटिकांच्या मालकांना संपर्क केला. त्यांनी साधकांना रोपे, माती आणि कुंड्या अल्प दरांत उपलब्ध करून दिल्या.
३. एकमेकांच्या सहकार्याने लागवड करणे
लागवडीसंदर्भात पुणे येथील श्रीमती ज्योती शहा यांनी ‘यू ट्यूब’वर ऑनलाईन अभ्यासवर्ग घेतल्यावर त्यात सांगितलेल्या कृती सर्व साधकांकडून करवून घेण्याचे नियोजन करण्यात आले. काही साधकांनी जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन यांपासून बनणारे एक नैसर्गिक खत) बनवून ते अन्य साधकांना देणे, जे रोपे बनवू शकतील, त्यांनी रोपे बनवून इतरांना देणे, कुणाकडे जागा अल्प असल्यास त्यांच्यासाठी अन्य साधकांनी स्वतःच्या घरी लागवड करणे यांसारख्या कृती केल्याने साधकांमध्ये संघटितपणा निर्माण होण्यास साहाय्य झाले.
४. जागा अल्प असूनही लागवड करणे
मुंबईमध्ये जागेची पुष्कळ मर्यादा येते, तरीही काही साधकांनी घरातील खिडक्यांमध्ये टांगता येण्याजोग्या कुंड्यांमध्ये, तसेच ‘बाल्कनी’त लहान लहान कुंड्या किंवा प्लास्टिकचे डबे ठेवून त्यांमध्ये लागवड केली. (छायाचित्र पहा.) तळमळ असेल, तर देव मार्ग सुचवतो, याची अनुभूती साधकांनी घेतली.
५. लागवडीसंबंधी संतांचा सत्संग आयोजित करणे
‘साधकांनी केलेले चांगले प्रयत्न सर्वांना समजावेत, तसेच या मोहिमेमध्ये सहभागी होण्याने आपली साधना कशी होणार आहे’, हे सर्व साधकांना लक्षात यावे, यासाठी सद्गुरु (सुश्री) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सर्व साधकांचा एकत्रित अभ्यासवर्ग घेतला. संतांच्या सत्संगामुळे साधकांचा उत्साह वाढला. साधकांचा आढावा घेऊन त्यातील अडचणींवर उपाययोजना काढता आल्या.’ (१७.७.२०२२)
– अधिवक्त्या (सौ.) ऋचा सुळे, बडोदा, गुजरात
‘सनातनची घरोघरी लागवड मोहीम’ चालू झाल्यावर मुंबईतील साधकांनी ‘जागेची अत्यंत न्यूनता असूनही लागवड करण्यास टाळाटाळ न करता मिळेल त्या जागेमध्ये लागवड करणे’, हे कौतुकास्पद आहे. सर्वत्रच्या साधकांनी अशी तळमळ ठेवून कृती करणे अपेक्षित आहे. – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (५.११.२०२२) |