आरोपीच्या बोलण्यावर विश्‍वास न ठेवता पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करावेत ! – मीरा बोरवणकर, माजी आय.पी.एस्. अधिकारी

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण

माजी आय.पी.एस्. अधिकारी मीरा बोरवणकर

मुंबई – आरोपीच्या बोलण्यावर अवलंबून रहाणे, ही पोलिसांची मोठी चूक ठरू शकते. आरोपीने दिलेल्या माहितीला पोलिसांनी शून्य मूल्य देऊन परिस्थितीजन्य पुरावे शोधले पाहिजेत, असा सल्ला माजी आय.पी.एस्. अधिकारी मीरा बोरवणकर यांनी श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात पोलिसांना दिला आहे.

मीरा बोरवणकर पुढे म्हणाल्या, ‘‘६ मासांपूर्वी झालेली हत्या सिद्ध करणे, हे पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. ‘डी.एन्.ए.’ (जनुकीय आणि वांशिकता साठवून ठेवणारा शरिरातील घटक) आणि अन्य तंत्रज्ञान यांमुळे अन्वेषणात, तसेच गुन्हा सिद्ध करण्यास साहाय्य होऊ शकते. पोलिसांना आढळलेले शरिराचे तुकडे हे श्रद्धाचेच आहेत, हे प्रथम सिद्ध करावे लागणार आहे. रक्ताचे नमुने, ‘सीसीटीव्ही फुटेज’, प्रत्यक्ष साक्षीदार आदी गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. श्रद्धा हिला तिच्या मित्र-मैत्रिणींचा आधार मिळाला नाही. मुलांनी पालकांशी बोलावे आणि पालकांनीही मुलांशी सातत्याने चर्चा केली पाहिजे. कायम संवाद ठेवला पाहिजे. श्रद्धाला कुटुंबाचा मानसिक आधार मिळाला असता, तर आजचे चित्र वेगळे असते.’’

सौजन्य : ABP MAJHA


आफताबची नार्काे चाचणी होणार !

(नार्काे चाचणी म्हणजे आरोपीला विशिष्ट औषध देऊन अर्धवट बेशुद्ध करून त्याच्याकडून माहिती मिळवणे)

नवी देहली – श्रद्धा वालकर हत्येच्या प्रकरणी येथील सत्र न्यायालयाने आरोपी आफताब पूनावाला याची नार्काे चाचणी करण्याची पोलिसांना अनुमती दिली आहे. नार्को चाचणीचा अहवाल न्यायालयात मान्य होत नसला, तरी आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांना या चाचणीचे साहाय्य होणार आहे. आफताबला अटक केल्यानंतर तो सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत असून त्याने अद्यापही श्रद्धाचा भ्रमणभाष संच आणि तिची हत्या करण्यासाठी वापरलेली करवत यांची माहिती दिलेली नाही.