महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे आंदोलनकर्त्यांकडून तळेगाव-चाकण महामार्ग रोखण्याचा प्रयत्न !

‘तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती’ चे ठिय्या आंदोलन

तळेगाव – तळेगाव चाकण महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाढते अपघात आणि तळेगाव वडगाव वाहतूक नियंत्रण शाखेकडून होत असलेल्या अवजड वाहन प्रवेशबंदीच्या पायमल्ली विरोधात ‘तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती’ने नुकतेच ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती चौकात सकाळपासूनच कृती समितीचे सदस्य आणि तळेगाव चाकण परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. समितीचे सदस्य आणि त्रस्त नागरिक यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.

आंदोलनानंतर आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी तळेगाव-चाकण महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोराड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले. ‘३१ डिसेंबरच्या पूर्वी अतिक्रमणे हटवून रस्त्याची देखभाल-दुरुस्ती पूर्ण करणार’, असे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोराड यांनी आंदोलकांना दिले.

 या वेळी आंदोलनकर्त्यांनी मागण्या केल्या की,

१. तळेगाव आणि वडगाव मावळ वाहतूक नियंत्रण शाखेच्या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

२. अवजड वाहतूक वडगाव येथून तळेगाव चाकण एम्.आय.डी.सी. मार्गे वळवावी.

संपादकीय भुमिका

स्वत:च्या निष्क्रीयतेमुळे जनतेला आंदोलन करण्यास लावणारे प्रशासन !