‘एकदा गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला बडोदा येथे गुजराथी भाषेत प्रवचन करण्याची सेवा मिळाली. मी गुजराथी भाषेतील प्रवचनातील शब्दांचा उच्चार मराठीत लिहून सराव केला.
१. प्रवचन करण्यापूर्वी अकस्मात् घशात त्रास होऊ लागल्यावर गुरुदेवांना प्रार्थना करणे
प्रवचन करण्यापूर्वी माझ्या घशात अकस्मात् तीव्र त्रास होऊ लागला. तेव्हा मी गुरुदेवांना शरण गेले. मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, माझ्या कंठाच्या ठिकाणी तुमचाच कंठ आहे’, असा माझा भाव असू दे. माझ्याकडून प्रवचन करण्याची सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे.’
२. प्रवचन करतांना परात्पर गुरुदेवांची अनुभवलेली कृपा !
अ. हे गुरुदेवा, मी प्रवचन करायला चालू केल्यावर तुमच्या अपार कृपेमुळे मला घशात कोणताच त्रास जाणवला नाही. त्या वेळी मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते.
आ. प्रवचन संपल्यानंतर जिज्ञासू माझ्याशी गुजराथी भाषेत बोलत होते. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही गुजराथी भाषा चांगली बोलता.’’
इ. मी साधकांना विचारले, ‘‘मी संहिता वाचत प्रवचन केले. माझ्या बोलण्यात सहजता होती का ?’’ तेव्हा साधकांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही प्रवचनाच्या वेळी एकदाही वहीत पाहिले नाही.’’
ई. मी संहिता वाचूनच प्रवचन केले होते, तरीही जिज्ञासूंना ‘मी प्रवचन वाचत आहे’, असे वाटले नाही. ‘मी त्यांच्याशी संवाद साधल्याप्रमाणे प्रवचन केले’, असे त्यांना वाटले.
‘परात्पर गुरुमाऊली, मला माझे क्रियमाण योग्य प्रकारे वापरता येऊन तुमच्या प्रती सतत कृतज्ञताभावात रहाता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. सोनाली पोत्रेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |