रेल्वे प्रवासात आता मिळणार सात्त्विक शाकाहारी जेवण !

रेल्वे आस्थापन आणि ‘इस्कॉन’ यांच्यात करार !

नवी देहली – रेल्वेने प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना प्रवासाच्या कालावधीत आता सात्त्विक शाकाहारी जेवण मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेचे आस्थापन ‘आय.आर्.सी.टी.सी.’ आणि ‘इस्कॉन’ ही आध्यात्मिक संस्था यांच्यामध्ये करार झाला आहे. यासाठी इस्कॉन मंदिराच्या ‘गोविंदा रेस्टॉरंट’कडून लोक शाकाहारी जेवणाची ऑनलाइन मागणी करू शकणार आहेत. ही सेवा सध्या देहलीतील हजरत निजामुद्दीन या रेल्वेस्थानकावरच चालू आहे.

यासंदर्भात रेल्वे बोर्डाने म्हटले की, दूरच्या प्रवासाच्या वेळी रेल्वेमध्ये मिळणार्‍या शाकाहारी जेवणाविषयी लोकांच्या मनात शंका असते. यासह कांदा-लसूण वर्ज्य असणार्‍यांनाही हे जेवण खायला अडचण असते. काही लोकांना रेल्वेतील स्वयंपाकघरात (‘पॅन्ट्री कार’मधील) जेवणाच्या गुणवत्तेविषयीही शंका असते; परंतु आता या नव्या सुविधेमुळे या अडचणी दूर होतील.

कसा घ्याल या सेवेचा लाभ ?

जर यात्रेकरूंना शाकाहारी जेवण हवे असेल, त्यांना ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या संकेतस्थळावरून अथवा ‘फूड ऑन ट्रॅक’ या भ्रमणभाषवरील ‘अ‍ॅप’वरून जेवण मागवता येईल. यासाठी यात्रेकरूंनी त्यांची रेल्वेगाडी सुटण्याच्या दोन घंट्यांआधी त्यांचा ‘पी.एन्.आर्.’ क्रमांक (यात्रेकरूंचा प्रवासी क्रमांक) देऊन हे जेवण मागवता येणार आहे. यात्रेकरूंनी मागवलेले जेवण त्यांच्या जागेवरच दिले जाईल.