पंजाबमध्ये श्री गुरु ग्रंथसाहिबचा अपमान केल्याच्या प्रकरणी डेरा सच्चा सौदा संप्रदायाच्या भक्ताची गोळ्या झाडून हत्या

फरीदकोट (पंजाब) – येथे श्री गुरु ग्रंथसाहिबचा अवमान केल्यावरून अज्ञातांनी डेरा सच्चा सौदा संप्रदायाचे भक्त प्रदीपसिंह यांची १० नोव्हेंबरला सकाळी गोळ्या झाडून हत्या केली. प्रदीपसिंह हे डेअरी उघडत असतांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. २ दुचाकी वाहनांवरून आलेल्या ६ जणांनी हा गोळीबार केला. घटनास्थळी प्रदीपसिंह यांचा बंदूकधारी अंगरक्षकही त्यांच्यासमवेत होता. त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला. त्याच्यासह अन्य २ जण घायाळ झाले.

यापूर्वी अशाच प्रकारचा अवमान केल्याचा आरोप असलेला डेरा सच्चा सौदा संप्रदायाचा भक्त महिंदरपाल बिट्टू याचीही २२ जून २०१९ या दिवशी कारागृहात हत्या करण्यात आली होती. बरगडी येथील श्री गुरु ग्रंथ साहिबच्या अपमान केल्याच्या प्रकरणी बिट्टू पकडला गेला होता.

(म्हणे) ‘कुणीही कायदा हातात घेऊ नये !’ – मुख्यमंत्री भगवंत मान

अशा प्रकारचे आवाहन करून कधीही गुन्हेगारी थांबत नाही, हे मान यांना कोण सांगणार ? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहेत, ते आम आदमी पक्षाचे सरकार कधी करणार ?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासंदर्भात ट्वीट करत म्हटले आहे की, पंजाब हे शांतताप्रिय राज्य आहे. येथे लोकांचा परस्पर बंधुभाव अत्यंत  भक्कम आहे. पंजाबची शांतता भंग करू देणार नाही. राज्यात शांतता राखण्यासाठी नागरी आणि पोलीस अधिकार्‍यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका 

पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती पहाता आताच त्यावर कठोर निर्णय घेत राष्ट्रपती शासन लाग करणे आवश्यक आहे !