भारतातील बुद्धीवादी देशविरोधी आहेत ! – ऑस्ट्रेलियातील प्रा. सॅल्वाटोर बेबोनेस

ऑस्ट्रेलियातील प्रा. सॅल्वाटोर बेबोनेस

मुंबई – भारतामध्ये धार्मिक हिंसाचाराविषयी, विशेषतः उत्तरप्रदेशमधील हिंसाचाराषियी फार चर्चा होते. आफ्रिका खंडातील रवांडा आणि बुरुंडी येथेही उत्तरप्रदेश इतकीच धार्मिक हिंसा झाली; मात्र या प्रकरणी केवळ उत्तरप्रदेशचेच नाव मोठ्या स्तरावर घेण्यात आले. बिहारमध्ये जशी स्थिती आहे, तशीच स्थिती कांगो देशातही आहे; मात्र चर्चा बिहारची अधिक होते. भारताविषयी एक प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे, जी अत्यंत धोकादायक आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे भारताची प्रतिमा वाईट करण्याचा प्रयत्न केला जातो, असे परखड प्रतिपादन ऑस्ट्रेलियातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’चे साहाय्यक प्राध्यापक सॅल्वाटोर बेबोनेस यांनी येथे केले. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये ‘इंडिया टुडे’चे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा ते बोलत होते.

१. प्रा. बेबोनेस पुढे म्हणाले की, भारतातील बुद्वीवादीवर्ग देशविरोधी आहे. भारताची प्रतिमा हुकूमशाह अशी दाखवण्यामागे भारतातील हेच बुद्धीवादी आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे यांचाच हात आहे. जगाला आणि जागतिक प्रसारमाध्यमांना भारताविषयी योग्य माहिती नाही.

२. प्रा. बेबोनेस म्हणाले की, भारत जगातील सर्वांत मोठा यशस्वी लोकशाही असलेला देश आहे. भारताने गुलामगिरीतून बाहेर पडत जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध केले आहे.

(संपूर्ण मुलाखत) सौजन्य: India Today

जागतिक भूक निर्देशांक चुकीच्या पद्धतीने सिद्ध करण्यात आला !

जागतिक भूक निर्देशांकाविषयी प्रा. बेबोनेस यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा निर्देशांक चुकीच्या पद्धतीने सिद्ध करण्यात आला होता. हा निर्देशांक सर्वेक्षणाच्या आधारे सिद्ध केला जातो. आता प्रश्‍न हा आहे की, सर्वेक्षण करणारे कुणाकडे माहिती घेण्यासाठी गेले होते ? यात बुद्धीवादी, विदेशी आणि भारतीय विद्यार्थी, खासगी संस्था, तसेच मानवाधिकार संघटनांशी संबंधित लोक होते. त्यांच्या भारतविरोधी मानसिकतेमुळे भारताला या निर्देशांकात वाईट स्तरावर दाखवण्यात आले.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठांनी नव्हे, तर एका विदेशी प्राध्यपकाने हे सांगितलेले आहे, हे भारतातील बुद्धीवादी स्वीकारतील का ? भारतातील राष्ट्रघातकी आणि धर्मघातकी बुद्धीवाद्यांना धर्मप्रेमी हिंदूंनी वैचारिक विरोध करत राहिला पाहिजे !