इस्रायलमध्ये पुन्हा ‘नेतान्याहू युग’ येण्याची चिन्हे !

१८ मासांपासून आहेत पंतप्रधानपदापासून दूर !

माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेलअवीव (इस्रायल) – इस्रायलमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल घोषित व्हायला आरंभ झाला असून ८४ टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात १२० जागांपैकी माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पाठिंबा देणार्‍या पक्षांना ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या उजव्या विचारसणीच्या लिकूड पक्षाला ‘रिलिजियस झियोनिझम्’ या अतीउजव्या राजकीय पक्षाचा पाठिंबा घ्यावे लागले आहे. ‘आम्ही मोठ्या विजयाच्या जवळ आहोत’, असे नेतान्याहू यांनी जेरुसलेम येथे त्यांच्या समर्थकांना संबोधित करतांना म्हटले.

१. निवडणुकोत्तर चाचण्यांनुसार १२० जागांपैकी नेतान्याहू यांना ६१ ते ६२ जागा, तर सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान यायर लॅपिड यांच्या पक्षाला ५४ ते ५५ जागांवर समाधान मानावे लागेल.

२. गेल्या ४ वर्षांत इस्रायलमध्ये पाचव्यांदा निवडणुका झाल्या आहेत. देशावर सर्वाधिक म्हणजे १२ वर्षे पंतप्रधानपदी असलेल्या नेतान्याहू यांना १८ मासांपूर्वी पायउतार व्हावे लागले होते. त्यांच्या जागी नेफ्ताली बेनेट निवडून आले होते. पुढे जुलै २०२२ मध्ये यायर लॅपिड हे देशाचे पंतप्रधान झाले.

अरबविरोधी पक्षाचा नेतन्याहू यांना पाठिंबा !

कट्टर राष्ट्रवादी, म्हणजे अतीउजव्या ‘रिलिजियस झायोनिझम्’ पक्षाने नेतान्याहू यांना पाठिंबा दिला आहे. ‘बीबीसी’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार निवडणूक प्रचाराच्या वेळी या पक्षाचे नेते इतामर बेन ग्विर आणि बेझालेल स्मोर्टरिक यांनी ‘इस्रायलशी विश्‍वासघात करणार्‍या अरब राजकारणी आणि नागरिक यांना इस्रायलमधून हद्दपार करावे’, असे म्हटले होते. आता त्यांचे सरकार येण्याची चिन्हे असल्याने मात्र बेन ग्विर म्हणाले, ‘आम्ही संपूर्ण इस्रायलच्या हितासाठी कार्य करू. आमच्या शत्रूंनाही साहाय्य करू.’