(म्हणे) ‘मोरबी पूल कोसळणे, ही देवाची इच्छा होती !’

आरोपीचे न्यायालयात वक्तव्य

मोरबी (गुजरात) – गुजरातमधील मोरबी येथे कोसळलेल्या झुलत्या पुलाच्या देखभालीचे दायित्व असणार्‍या ओरेवा आस्थापनाचे व्यवस्थापक दीपक पारेख यांनी ‘हा पूल कोसळणे, ही देवाची इच्छा होती’, असे वक्तव्य न्यायालयात केले. या वेळी सरकारी अधिवक्त्यांनी ‘पुलाच्या केबल्स जीर्ण झाल्या होत्या आणि नूतनीकरणाच्या वेळी त्या पालटण्यात आल्या नव्हत्या’, अशी माहिती न्यायालयाला दिली. मोरबी आणि राजकोट बार असोसिएशनने या दुर्घटनेसाठी उत्तरदायींचे वकिलपत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

१. पुलाची देखभाल करण्यासाठी मोरबी महानगरपालिका आणि अंजता ओरेवा आस्थापन यांच्यात १५ वर्षांसाठी करार झाला होती. मार्च २०२२ मध्ये हा करार करण्यात आला. वर्ष २०३७ पर्यंत या कराराची मुदत आहे. या अपघाताच्या प्रकरणी दीपक पारेख, दिनेश दवे, मनसुख टोपिया, महादेव सोळंकी, प्रकाश परमार, देवांग, अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल आणि मुकेश चौहान यांना अटक करण्यात आली.

२. पुलाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली पुलाच्या लाकडी पायाच्या जागी अ‍ॅल्युमिनियमच्या पत्र्यांचे ४ थर लावण्यात आले. त्यामुळे पुलाचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले. जुन्या केबल्सना हा भार पेलता न आल्याने गर्दी वाढताच हा पूल कोसळला. गुजरात पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.

३. सरकारी अधिवक्ता पांचाळ यांनी सांगितले की, ‘फॉरेन्सिक सायन्स लॅब’च्या तपासणीत असे आढळून आले की, ज्या ४ केबल्सवर पूल उभार होता, त्या दुरुस्तीच्या ७ मासांत पालटण्यात आल्या नव्हत्या. ज्या कंत्राटदारांनी दुरुस्ती करून घेतली, त्यांना झुलत्या पुलाचे तंत्रज्ञान आणि संरचनेच्या भक्कमतेविषयी आवश्यक ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांनी केवळ पुलाच्या वरच्या सजावटीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच पूल भक्कम दिसत होता; पण आतून कमकुवत होता.

संपादकीय भूमिका

स्वतःचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा यांमुळे झालेल्या अपघाताचे खापर देवावर फोडणार्‍यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !