गोवा : सरकारने कांपाल येथील ‘वेस्ट टू आर्ट पार्क’ची निविदा मागे घेतली

  • भंगारातून साकारण्यात येणार होत्या प्रतिकृती

  • कलाकार आणि राजकीय विरोधक यांचा विरोध

पणजी, १ नोव्हेंबर (वार्ता.) – कांपाल येथे भगवान महावीर उद्यानात येऊ घातलेल्या ‘वेस्ट टू आर्ट पार्क’ प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने ८ कोटी ९२ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या निविदा मागे घेतल्या आहेत. या नियोजित प्रकल्पाला जागरूक नागरिक आणि कलाकार यांनी तीव्र विरोध केला होता.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘वेस्ट टू आर्ट पार्क’ या संकल्पनेवर पार्कची उभारणी करण्यात येणार होती. या प्रकल्पात भंगारातून ‘पॅरीस(फ्रान्स)मधील आयफेल टॉवर’, ‘इटलीतील टॉवर ऑफ पिसा’, न्यूयॉर्कमधील (अमेरिका) ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ (स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा), भारतातील ताजमहाल आदींच्या प्रतिकृती, तसेच विविध शिल्पे आणि कलाकृती साकारण्यात येणार होती. या सर्व कलाकृती सरकारी खात्यांमध्ये पडून असलेल्या भंगार साहित्यातून सिद्ध करण्यात येणार होत्या. यासाठी सुमारे २०० किलो भंगाराचा वापर करण्यात येणार होता. यासाठी महामंडळाने ‘आर्ट पार्क’चे ‘डिझाईन’, ‘इंजिनीयरिंग’ आणि विकास यांसाठी निविदा काढल्या होत्या. इसारा रक्कम (डिपॉझिट) म्हणून १७ लाख ८५ सहस्र ८१६ रुपये जमा करण्यास सांगितले होते.

या प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून तो वादात अडकला होता. अनेक गोमंतकीय कलाकारांनी याला आक्षेप घेतला होता. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ‘क्युरेटर’ न नेमता प्रकल्पाची निविदा का काढली? असा प्रश्न करून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. चित्रकार सुबोध केरकर यांनी प्रकल्पासाठी महामंडळाने अनुभवी आणि तज्ञ ‘क्युरेटर’ नेमण्याची मागणी केली होती. लोटली येथील ‘ॲन्सेस्ट्रल गोवा’चे महेंद्र आल्वारिस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. बाणावली येथील ‘गोवा चित्र’चे व्हिक्टर गोम्स यांनी प्रकल्पात जागतिक स्तरावरील प्रतिकृती उभारण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करून ‘गोव्यातील वारसा स्थळांची प्रतिकृती का नाही ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता.

(सौजन्य : Prudent Media Goa)

याविषयी घनकचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात म्हणाले, ‘‘कांपालवासियांचा या ‘पार्क’ला विरोध असल्याने सरकारने हा प्रकल्प तेथे न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प अन्य ठिकाणी नेण्यात येणार असून नवीन जागेची लवकरच घोषणा केली जाणार आहे.’’