शैक्षणिक तणावावर तोडगा म्हणून ‘आयआयटी’ची पदविका योजना

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – काही विद्यार्थी शैक्षणिक तणावाला तोंड देऊ शकत नसल्याने ‘आयआयटी’ शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यावर तोडगा म्हणून ‘आयआयटी’ने ‘बीटेक’ विद्यार्थ्यांसाठी २ वर्षांनंतर पदविका प्रदान करण्याची योजना सिद्ध केली आहे. काही आयआयटी संस्थांनी सूचवलेल्या या प्रस्तावावर ‘आयआयटी परिषदे’ने निर्णय घ्यावा, असे या संस्थांच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

वर्ष २०१९ मध्ये आयआयटी परिषदेने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना ३ वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. विद्यार्थ्यांना ४ वर्षांच्या ‘बीटेक’ अभ्यासक्रमाची सक्ती करण्याऐवजी त्यांना दुसर्‍या सत्रानंतर ‘बी.एस्.सी.’ (अभियांत्रिकी) पदवी निवडण्याची अनुमती देण्यात आली होती, तसेच ६ सत्रांनंतर पदवी प्रदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती.

शैक्षणिक ताणतणाव आणि अयशस्वी प्रेमप्रकरणे, ही विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी २ मोठी कारणे आहेत, असे ‘आयआयटी’ कानपूरच्या प्राध्यापकाने सांगितले.  (विद्यार्थ्यांना साधना आणि नैतिक मूल्ये यांचे शिक्षण न दिले गेल्याने त्यांना निराशेवर नियंत्रण मिळवता येत नाही आणि ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात ! – संपादक)