इटलीतील नवे सरकार ‘रेव्ह पार्ट्यां’च्या आयोजकांवर कठोर कारवाई करणार

(टीप : रेव्ह पार्टी म्हणजे नृत्य-गाणे यांसमवेत मद्य, अमली पदार्थ सेवन करण्यासारख्या अवैध गोष्टींची मेजवानी)

प्रतिकात्मक छायाचित्र

मोडेना (इटली) – ज्योर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील कट्टर राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या इटली सरकारने रेव्ह पार्ट्या आयोजित करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पार्ट्यांना उपस्थित रहाणार्‍यांना ६ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो, तसेच अन्वेषण करण्यासाठी अशा पार्ट्या आयोजित करणार्‍यांच्या भ्रमणभाषावरील संभाषण मुद्रित केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. ३१ ऑक्टोबर या दिवशी मोडेना शहरात अशाच प्रकारच्या पार्टीत सहभागी झालेल्या १ सहस्र लोकांना ते ठिकाण सोडण्याचा आदेश देण्यात आला होता.

इटलीतील आधीचे सरकारही रेव्ह पार्ट्यांच्या विरोधातील कायदा अधिक कठोर करण्यासाठी प्रयत्न करत होते; पण आता निवडून आलेले सरकार आयोजकांकडून मोठ्या प्रमाणात हानीभरपाई घेण्यासह ध्वनीवर्धक यंत्रणा कह्यात घेण्यासारकी कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.