कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणार्‍या दिंडीमध्ये चारचाकी वाहन घुसून ७ भाविकांना चिरडले !

अपघातात ८ भाविक घायाळ

सांगोला (जिल्हा सोलापूर), १ नोव्हेंबर (वार्ता.) – मिरज येथून कार्तिकी वारीसाठी पायी निघालेल्या वारकर्‍यांच्या दिंडीमध्ये चारचाकी वाहन शिरून त्याने ७ भाविकांना चिरडले. हा भीषण अपघात सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी झाला. या वेळी ८ वारकरीही गंभीर घायाळ झाले आहेत.

मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाचे रहिवासी आहेत. जठारवाडी गावातील वारकर्‍यांची दिंडी कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पायी पंढरपूरकडे निघाली होती. घायाळ झालेल्या वारकर्‍यांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये ३५ वारकरी सहभागी झाले होते.

दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे घोषित केले आहे.