नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

प.पू. काणे महाराज

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा पाचवा पुण्यतिथी उत्सव २८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. प्रारंभी सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत श्री. गणेश दत्तात्रय भुसारी आणि सौ. मनीषा गणेश भुसारी यांच्या हस्ते प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक अन् पवमान अभिषेक करण्यात आला. श्री. पुरुषोत्तम मधुकर कुलकर्णी यांनी याचे पौरोहित्य केले. यानंतर भक्तांनी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप केला. या वेळी प.पू. काणे महाराज आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य श्री. शशिकांत ठुसे अन् भक्त मंडळी उपस्थित होती. सौ. शीतल ठुसे (श्री. शशिकांत ठुसे यांचा पुतण्या श्री. श्रीपाद ठुसे यांच्या पत्नी) यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदाताई आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. यानंतर भक्त श्री. मुकुंद कुलकर्णी आणि श्री. देशपांडे यांनी प.पू. काणे महाराजांच्या संदर्भातील आठवणी सांगितल्या. या वेळी सनातन संस्थेचे डॉ. राहुल दवंडे यांनी श्री. शशिकांत ठुसे यांना वर्ष २०२३ चे ‘सनातन पंचांग’ भेट दिले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

ज्ञानयोगी आणि शिष्यांना अखंड शिकवणारे प.पू. काणे महाराज यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्ष १९८७ मध्ये प.पू. भक्तराज महाराज माझ्या जीवनात येण्याआधी काही संतांनी मला अध्यात्मशास्त्र शिकवले. त्यातील एक प्रमुख संत म्हणजे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील प.पू. काणे महाराज ! मला ज्ञानमार्ग शिकवणारे प.पू. काणे महाराज हे एकमेवाद्वितीय होते. वर्ष १९८९ ते वर्ष १९९३ या काळात ते अनेकदा आमच्या घरी राहिले. त्यांनी अध्यात्माची पुष्कळ तात्त्विक माहिती मला दिली. ते प्रत्येक वेळी आमच्या घरी आल्यापासून ते घरून निघून जाईपर्यंत त्यांचे प्रत्येक मिनिट मी त्यांना प्रश्न विचारत असे. ज्ञानमार्गाची भाषा कठीण असली, तरी ते विषय सोपा करून शिकवत. ‘जीवनातील विविध प्रसंगांत कसे रहायचे ?’ हेही ते शिकवायचे. त्यांची ही शिकवण सनातनच्या ग्रंथांत दिली आहे. त्यांच्या आमच्या घरच्या वास्तव्यामुळे ‘संत बोलतात आणि वागतात कसे ? संतांसमवेत कसे वागायचे ?’ इत्यादी अनेक गोष्टी मला शिकता आल्या, म्हणजे एक प्रकारे साधनेचा पायाच त्यांनी घातला. तन-मन-धनाचा त्याग कसा करतात ? खडतर तपश्चर्या कशी असते ? इत्यादी अनेक विषय मला त्यांच्याकडून शिकता आले. यासाठी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच !

त्यांनी त्यांचे शिष्य श्री. शशिकांत ठुसे यांनाही त्यांच्याप्रमाणे घडवले आहे आणि साधनेत पुढे नेले आहे. ‘प.पू. काणे महाराज यांची कृपा माझ्यावर आणि त्यांच्या सर्व भक्तांवर अखंड राहो’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.१०.२०२२)

प.पू. काणे महाराज एक अनाकलनीय व्यक्तीमत्त्व !

डॉ. (सौ.) कुंदा आठवले

प.पू. काणे महाराजांचा प्रथम परिचय वर्ष १९८९ मध्ये कांदळी मुक्कामी झाला. ते प.पू. भक्तराज महाराजांना भेटायला आले होते. प.पू. काणे महाराज आणि प.पू. डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे मोठे भाऊ एकमेकांना ओळखत होते. प.पू. डॉक्टरांची अध्यात्माविषयीची आवड बघून त्यांना कुतूहल वाटले. एकदा प.पू. काणे महाराज ठाण्याला त्यांच्या नातेवाइकांकडे आले असतांना, तिथून अकस्मात आमच्याकडे आले. त्यांची प.पू. डॉक्टरांशी अध्यात्मावर पुष्कळ चर्चा झाली. त्यानंतर जवळजवळ सहा-सात मास त्यांचा आमच्याकडे मुक्काम होता. त्यांचा ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत यांचा गाढा अभ्यास होता. ज्ञानाचे भांडार त्यांच्याकडे होते. प.पू. डॉक्टर ज्ञानपिपासू होते. त्यामुळे प.पू. डॉक्टरांनी प.पू. काणे महाराज यांच्याशी झालेल्या चर्चेतून बरीच टिपणे सिद्ध केली. त्याचा उपयोग त्यांना पुढे ग्रंथ लिहितांना झाला. प.पू. डॉक्टरांनी त्यांची सेवाही पुष्कळ केली. त्यामुळे ते म्हणायचे ‘शिष्य असावा तर जयंतासारखा !’

प.पू. भक्तराज महाराजांविषयी प.पू. काणे महाराजांना पुष्कळ आदर होता. आमच्याकडे मुक्कामाला असतांना ते म्हणाले होते, ‘‘या भारतभूमीचा सगळा कारभार पाच संत चालवतात, त्यातील एक प.पू. भक्तराज महाराज ! बाकीचे चार हिमालयात वास्तव्यास असतात.’’

सायनला असतांना माझी घर, चिकित्सालय, अध्यात्मप्रसार अशी चाललेली धावपळ प.पू. काणे महाराज बघत होते. मग स्वतःसाठी चहा बनवतांना मलाही द्यायचे. ते पुष्कळ प्रेमळ होते; परंतु कधी कधी काही गोष्टींवर नाहक वाद घालायचे. कधी कधी मला चिडायला व्हायचे. असाच एक प्रसंग साधकांसमोर घडला. मी थोडीशी रागातच त्यांच्यासमोरून निघून गेले. तेव्हा तिथे असलेल्या साधकांना त्यांनी सांगितले ‘तिच्या रागाकडे पाहू नका, ती आतून पुष्कळ प्रेमळ आहे.’ अशा प्रकारे त्यांच्या बोलण्या-वागण्याने उपस्थित संभ्रमित व्हायचे. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा थांगपत्ता लागायचा नाही, ते समजण्याच्या पलीकडचे होते. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, त्यांच्या चरणी कोटी

कोटी प्रणाम !

– डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले (२८.१०.२०२२)

प.पू. काणे महाराजांच्या भक्तांनी व्यक्त केलेले मनोगत !

१. श्री. मुकुंद कुलकर्णी

प.पू. काणे महाराज आमच्याकडे रहायला होते. त्यांचा मला आणि माझ्या पत्नीला आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला. आमच्यासाठी ते आयुर्वेदाची औषधे सिद्ध करत. त्याचा आम्हाला पुष्कळ लाभ झाला.

२. श्री. देशपांडे

प.पू. काणे महाराज यांचा माझ्या पत्नीला आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला. आळंदीचे आनंदाश्रम स्वामी आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे ते स्वतःहून घेऊन गेले. ‘आध्यात्मिक ज्ञान मिळेल तेथून घेण्यासाठी कधीही हरकत नसावी’, असे त्यांनी शिकवले.