‘आझादीका अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत गोवा पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा विविध कला सादरीकरणाद्वारे सहभाग !

श्री. शॉन क्लार्क यांना मानचिन्ह देतांना केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (गोवा प्रभाग) अधीक्षक श्री. हेमसागर नायक

फोंडा (गोवा) – भारत शासनाच्या पुरातत्त्व सर्वेक्षण, गोवा विभागाच्या वतीने २७ सप्टेंबर २०२२ या दिवशी तांबडी सुर्ला येथे ‘जागतिक पर्यटन दिना’च्या निमित्ताने ‘आझादीका अमृत महोत्सवा’च्या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम येथील १२ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिराच्या आवारात पार पडला. या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्‍वविद्यालयाच्या सौ. श्‍वेता क्लार्क यांनी केले.

१. या प्रसंगी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या नृत्य विभागातील साधिका कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी एकत्रित गुरुवंदना सादर केली. त्यानंतर विश्‍वविद्यालयाच्या अन्य साधिकांनी शिवस्तुती, शिववंदना, तिल्लाना, विष्णुभजन, देवीस्तुती आदी नृत्यप्रकार सादर केले.

२. यानंतर श्री. मनोज सहस्रबुद्धे यांचे सतारवादन झाले. त्यांनी सतारीवर राग ‘हंसध्वनी’ वाजवला. त्यांना तबल्यावर श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांनी साथ दिली.

३. त्यानंतर कु. मयुरी आगावणे, सौ अनघा जोशी, श्री. अनिल सामंत आणि सुश्री तेजल पात्रीकर यांनी वेगवेगळी भजने अन् भक्तीगीते सादर केली.

४. कार्यक्रमाच्या आरंभी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन विभागाचे सदस्य आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क, ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत विशारद सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे, सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनघा जोशी यांचे स्वागत मानपत्र अन् स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आले.

केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला दिलेले प्रमाणपत्र

 वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. उपस्थितांपैकी एका महिला अधिकार्‍यांनी ‘कार्यक्रम आध्यात्मिक स्तरावर झाला. आतापर्यंत अनेक कार्यक्रम पाहिले असले, तरी या कार्यक्रमातील अनुभव पूर्वी कधी अनुभवायला मिळाला नाही’, असे सांगितले.

२. अन्य एका छायाचित्रकाराने ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांचे संगीत क्षेत्रातील संशोधन आध्यात्मिक स्तरावर कसे उच्च आहे, हे अनुभवायला मिळाले’, असे सांगितले.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून आभार व्यक्त

या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांना सहभागी करून घेतले, यासाठी भरतीय पुरातत्व सर्वेक्षण, गोवा विभाग आणि विभागाचे अधीक्षक श्री. हेमसागर नायक, सदस्य श्री. तरंग घारपुरे अन् कार्यकर्ते यांच्या प्रती महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने आभार मानले आहेत.

क्षणचित्रे

१. ‘कार्यक्रमस्थळी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक पोचल्यावर वातावरणात आनंदाचे आणि चैतन्याचे पुष्कळ प्रक्षेपण होत आहे’, असे तिथे उपस्थित असलेल्या साधकांना जाणवले.

२. पाऊस पडण्याची शक्यता होती; परंतु पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत पाऊस पडला नाही.

३. तांबडी सुर्ल येथे आलेल्या अनेक पर्यटकांनीही हा कार्यक्रम थांबून पाहिला.