पणजी, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – पोलिसांनी वर्ष २०१४ मध्ये धाड टाकून इसाक नडाफ याच्याकडून गांजा कह्यात घेतला होता. पोलिसांनी संशयित नडाफ याच्याविरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले असून त्याच्या विरोधात न्यायालयात सुनावणी चालू आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी धाडीच्या वेळी कह्यात घेतलेला गांजा न्यायालयात पुरावा म्हणून सुपुर्द करण्यासाठी म्हापसा पोलीस ठाण्याच्या पुरावा कक्षात ठेवण्यात आला होता; मात्र तो आता गायब झालेला आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. यापूर्वी सुमारे १२ वर्षांपूर्वी पणजी येथील पोलीस मुख्यालयातील गोदामातून २०० किलो हशीश हा अमली पदार्थ गायब झाला होता.
पोलिसांनी २३ मे २०१४ या दिवशी गांधी चौक, म्हापसा येथे छापा टाकून एकतानगर हाऊसिंग बोर्ड येथे वास्तव्यास असलेला नडाफ याच्याकडून गांजा कह्यात घेतला होता आणि यानंतर त्याच्या विरोधात ‘एन्.डी.पी.एस्.’ कायद्याच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणाचे २ अन्वेषण अधिकारी अन्वेषण करत आहेत. आरोपपत्र प्रविष्ट करण्यापूर्वी वर्ष २०१५ मध्ये कह्यात घेतलेले अमली पदार्थ चाचणीसाठी जुलै २०१४ मध्ये ‘फॉरेन्सिक’ चाचणीसाठी पाठवण्यात आले होते आणि सुमारे एक मासाने ‘फॉरेन्सिक’ प्रयोगशाळेने कह्यात घेतलेला गांजा असल्याचे चाचणीअंती कळवून मुद्देमाल पोलिसांना परत केला होता आणि त्या वेळेच्या अन्वेषण अधिकार्याने मुद्देमाल पोलिसांना परत मिळाल्याची कागदोपत्री माहिती उपलब्ध आहे. या प्रकरणी दायित्व घेण्यास संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने नकार दर्शवल्याने प्रथम श्रेणी न्यायालयाने या प्रकरणी संबंधित प्रमुख हवालदाराला नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
कर्लिस क्लबचे एडविन न्युनीस भाग्यनगर पोलिसांना शरण
पणजी, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – भाग्यनगर अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणी सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील एक संशयित आणि हणजूण येथील कर्लिस क्लबचा मालक एडविन न्युनीस भाग्यनगर येथील उस्मानिया विद्यापीठ पोलिसांना शरण आला आहे. पोलिसांनी त्याला कह्यात घेऊन १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे. भाग्यनगर येथील मेट्रोपॉलिटन सत्र न्यायालयात आणि त्यानंतर तेलंगाणा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज संबंधित न्यायालयांनी फेटाळल्यानंतर एडविन न्युनीस याने सर्वाेच्च न्यायालयात आव्हान अर्ज प्रविष्ट केला होता. यानंतर सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केलेला आव्हान अर्ज मागे घेऊन एडविन न्युनीस उस्मानिया विद्यापीठ पोलिसांना शरण आला.
_______________________________
गोवा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सरकार कृतीशील ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
पणजी – गोवा राज्य अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सरकार कृतीशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
ते म्हणाले,
‘‘देशातील विविध राज्यांची अमली पदार्थ व्यवहार नष्ट करण्यासाठी संयुक्त बैठक झाली. या बैठकीत राज्यांनी ते करत असलेले प्रयत्न सांगितले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मार्गदर्शन केले. भारत देश अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. गोव्यात असलेल्या स्थानबद्धता केंद्राविषयीही (डिटेंशन सेंटरविषयीही) बैठकीत माहिती देण्यात आली.
Joined and addressed the VC Regional Meeting on Drug Trafficking & National Security chaired by Union Home and Co-operation Minister Shri @AmitShah Ji. 1/4 pic.twitter.com/o83GPRQLgA
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) October 26, 2022
वर्ष २०१९ पासून आतापर्यंत १२९ लोकांना स्थानबद्धता केंद्रात ठेवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे. गोव्यात अवैधपणे वास्तव्य करणार्या ७०० पैकी ६५० नायजेरियाच्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे. रेल्वे आणि बस यांमधून कामगार लोक गांजा आणि चरस गोव्यात आणत आहेत. गोव्यात येणारे आंतरराष्ट्रीय पर्यटकही अमली पदार्थ गोव्यात आणत आहेत. पार्ट्यांना प्रोत्साहन देणारा अनधिकृत क्लब पाडण्यास गोवा शासनाने कुचराई केलेली नाही. गोवा नशामुक्त करण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी जागृती मोहीम आरंभली आहे.’’
संपादकीय भूमिकायाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! कह्यात घेतलेला अमली पदार्थ भ्रष्टाचारी पोलीस पुन्हा अमली पदार्थ व्यावसायिकांना विकतात का ? याची कसून चौकशी व्हायला हवी ! |