सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकाला पोटदुखी दूर होण्यासाठी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे साधक स्थिर राहून वेदना सहन करू शकणे आणि साधकाने मूतखड्याची व्याधी दूर होण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे कृपाप्रसादरूपी मंत्रोपाय केल्यावर काही दिवसांतच त्याची पोटदुखी दूर होणे

‘दळणवळण बंदी चालू झाल्यानंतर काही दिवसांनी मला अकस्मात् पोटदुखीचा त्रास होऊ लागला. माझ्यावर त्यासाठी औषधोपचार चालू होते; पण माझा त्रास दिवसेंदिवस वाढतच होता.

श्री. दीपक गोडसे

१. आधुनिक वैद्यांना साधकाच्या दुखण्याचे ठिकाण लक्षात येत नसतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकाला त्याच्या दुखण्याचे ठिकाण अचूक सांगून त्यावर नामजपादी उपाय सांगणे

मी पोटदुखी दूर होण्यासाठी प्रतिदिन सकाळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना नामजपादी उपाय विचारण्यासाठी जात होतो. मला वेदना होत असलेले ठिकाण आधुनिक वैद्यांना माझ्या पोटावर हात लावूनही सहसा लक्षात येत नसतांना सद्गुरु दादा मला माझ्या दुखण्याचे ठिकाण अचूक सांगून त्यावर नामजपादी उपाय सांगत होते, उदा. नाभीच्या २ बोटे वर, उजवीकडे किंवा डावीकडे. प्रत्यक्षातही ते ज्या ठिकाणी सांगत, त्याच ठिकाणी मला त्रास होत असे.

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे स्थिर राहून वेदना सहन करू शकणे

मी सलग १५ दिवस सद्गुरु दादांनी सांगितलेले नामजपादी उपाय करत होतो. मी त्यांना सकाळी नामजपादी उपाय विचारून दिवसभरात ते पूर्ण करत असे. सद्गुरु दादांनी नामजपादी उपाय सांगितल्यामुळे मी वेदना स्थिर राहून सहन करू शकत होतो; पण पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी मला त्रास होत असे.

३. ‘मूतखड्यामुळे आता पोटात दुखत असावे’, अशी शक्यता वाटणे, या व्याधीवर परात्पर गुरु पांडे महाराज यांचे कृपाप्रसादरूपी मंत्रोपाय मिळणे अन् ते केल्यावर काही दिवसांतच पोटदुखी दूर होणे

मागील वर्षी मला मूतखड्याचा त्रास झाला होता. ‘मूतखड्यामुळेही माझ्या पोटात दुखत असावे’, अशी शक्यता वाटत होती. दळणवळण बंदीमुळे सर्व रुग्णालये बंद होती. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या कृपेमुळे मला मूतखड्याची व्याधी दूर होण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांचे कृपाप्रसादरूपी मंत्रोपाय मिळाले. मी ते मंत्रोपाय दिवसभरातून ३ वेळा करत होतो. त्यामुळे माझा पोटदुखीचा त्रास १२ ते १५ दिवसांत दूर झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले, परात्पर गुरु पांडे महाराज, सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. दीपक गोडसे, सनातन आश्रम, देवद. (५.१०.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक