नदी प्रदूषणाचे गुन्हेगार !

ऐन पावसाळ्यातही इंद्रायणी नदी प्रदूषितच . . .

पिंपरी-चिंचवड महापालिका (पुणे) हद्दीतून, तसेच इंद्रायणी नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे १४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी इंद्रायणी नदी रासायनिक पाण्याने पुन्हा फेसाळली. इंद्रायणी असो वा अन्य कोणतीही नदी असो ‘या सर्व गोष्टी आपल्या आहेत आणि आपल्याकरता राष्ट्रीय संपत्ती आहेत’, ही भावना जोपर्यंत लोकांच्या अंतर्मनात रुजत नाही, तोपर्यंत ‘नद्या स्वच्छता अभियान’ कितीही राबवले, तरी काहीही भेद जाणवणार नाही, हेच सत्य आहे.

गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी बलीदान देणारे प्रा. जी.डी. अगरवाल म्हणजेच स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांचे उदाहरण अत्यंत प्रेरणादायी आहे. फक्त भावनिकतेने नव्हे, तर शास्त्रीयदृष्ट्या प्रदूषण रोखून गंगेचे पुनरुज्जीवन कसे करता येईल ? यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यापूर्वी काँग्रेसच्या मनमोहन सिंह सरकारविरुद्धही त्यांनी गंगा प्रश्नावर लढा दिला होता. फिलिपाईन्स देशातील मनीला शहरातील नदीची अवस्था भारतातील नद्यांपेक्षा वाईट होती. त्यांनी ही परिस्थिती पालटण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावले उचलली. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ‘यार्रा’ नदीच्या उगमाजवळचे १ लाख हेक्टर क्षेत्र सुरक्षित आहे. त्या दृष्टीने विचार केल्यास खरेतर भारतातील नद्यांचे आध्यात्मिक दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. इंद्रायणी नदीचा विचार केल्यास तिच्या उत्तर तीरावर अनेक सत्पुरुष आणि संत यांची समाधीस्थाने आहेत. असे असतांना आपण नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी किती प्रयत्न करायला हवेत ? याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. ‘आपल्या गावातील नदी स्वच्छ रहायला हवी’, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी.

‘कारखाने, नदी किनार्‍यावरील रहिवासी ते नगर परिषद, जिल्हा परिषद, महापालिका यांसारख्या यंत्रणांसह सर्वच जण नदी प्रदूषणाचे गुन्हेगार आहेत’, असे म्हटल्यास चूक होणार नाही. न्यायालयीन यंत्रणा आणि पोलीस यांनी एकत्र येऊन प्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. उल्हासनगरमधील वालधुनी नदीच्या प्रदूषणाविषयी दंडात्मक कारवाई झाल्याने त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. देशातील सर्वच नद्यांविषयी अशी कठोर दंडात्मक भूमिका घेतली, तर पुढे होणार्‍या प्रदूषणाला आळा घालता येईल.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे