‘एफ्.ए.टी.एफ्’ने ५०० अज्ञात लोकांच्या प्रेतांविषयी पाककडे आधी विचारणा केली पाहिजे !

तारेक फतह यांचे पाकचा चेहरा उघड करणारे विधान !

तारेक फतह

टोरंटो (कॅनडा) – ‘एफ्.ए.टी.एफ्’ने (‘फायनॅन्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने) पाकिस्तानकडून ‘आम्हाला करड्या सूचीतून बाहेर काढा’, या करण्यात आलेल्या मागणीला मान्यता देऊ नये, असे कॅनडा येथील पाकिस्तानी मूळचे वरिष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध लेखक तारेक फतह यांनी केली आहे. त्यांनी ‘एफ्.ए.टी.एफ्’ने घेतलेल्या निर्णयाच्या काही घंट्यांआधी २१ ऑक्टोबर या दिवशी काही ट्वीट्स करून पाकिस्तानचे जिहादी वास्तव विशद केले.

१. फतह यांनी ट्वीट केले, ‘‘एफ्.ए.टी.एफ्’ने पाकच्या मुल्तान येथील एका रुग्णालयाच्या छतावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आलेल्या ५०० अज्ञात लोकांच्या प्रेतांविषयी पाककडे विचारणा केली पाहिजे. मुल्तान हे शहर पाकिस्तानी सैन्याच्या सर्वांत मोठ्या केंद्रांपैकी एक केंद्र आहे. नागरिक संघ आणि मानवाधिकार संघटना यांनी आरोप केले आहेत की, ही सर्व प्रेते त्या लोकांची आहेत, ज्यांचे गेल्या अनेक वर्षांत पाक सैन्याने अपहरण केले होते.’’

२. फतह पुढे म्हणतात, ‘‘त्यामुळे ‘एफ्.ए.टी.एफ्’ने पाकच्या विनंतीकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. ‘एफ्.ए.टी.एफ्’ने प्रथम मुल्तान प्रकरणावर अन्वेषण करण्याची मागणी केली पाहिजे. पाकमधील अधिकृत अन्वेषण आयोगानेही ५ सहस्र लोक गायब असल्याविषयीचा उल्लेख केलेला आहे. प्रसारमाध्यमे आणि मानवाधिकार संघटनांच्या मते तर बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतातील ४० सहस्र लोक गायब आहेत.’’