धर्माच्या नावाखाली आपण कुठे पोचलो आहोत ? – सर्वोच्च न्यायालय

 मुसलमानांच्या विरोधातील कथित हिंसाचार आणि वक्तव्ये यांचे प्रकरण

देहली, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश पोलिसांना नोटीस !

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – हे २१ वे शतक आहे. आपण धर्माच्या नावाखाली कुठे पोचलो आहोत ? लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता असलेल्या देशामध्ये द्वेषापायी करण्यात येणारी हिंसा अन् वक्तव्ये धक्कादायक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना नोंदवले. न्यायमूर्ती के.एम्. जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपिठाने ही सुनवाणी केली. मुसलमानांना लक्ष्य करून त्यांच्या विरोधात कथितपणे वाढत असलेल्या हिंसेच्या घटनांवर त्वरित लक्ष घालण्याच्या याचिकेवर न्यायालयाने ही सुनावणी केली.

२१ ऑक्टोबरच्या सायंकाळी झालेल्या या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने देहली, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश पोलिसांना नोटीसही बजावली. न्यायालयाने येथील राज्य सरकारे आणि पोलीस यांनी द्वेष पसरवणार्‍या वक्तव्यांसंदर्भात कोणतीही तक्रार येण्याची वाट न पहाता ‘सुओ मोटो’ कारवाई करण्याचे आदेशही दिले. आदेशाचे पालन न करणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या विरोधात ‘न्यायालयाचा अवमान’ केल्याचा ठपका ठेवण्यात येईल, असेही न्यायालयाने नमूद केले.